टोरोंटो – विषाणूरोधक म्हणून पूर्वी माहित असलेली औषधे कोविड-19 वर उपचार करताना रुग्णांना बरी करण्यासाठी उपयोगी ठरू शकतील, असे संशोधकांनी प्रथमच म्हटले आहे. यामुळे जगभरात फैलावलेली ही साथ आटोक्यात आणण्यासाठी बहुमोल मदत मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. “फ्रॉन्टियर इन इम्युनोलॉजी’ या विज्ञानविषयक नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधामध्ये अशा विषाणूरोधक औषधांच्या वापराबाबतची माहिती देण्यात आली आहे.
ड्रग इंटरफेरॉन (आयएफएन- ए 2 बी)च्या उपचारामुळे विषाणू नष्ट करण्यास आणि रुग्णाच्या शरीरातील घातक प्रोटीन्सची पातळी कमी करण्यास मदत होऊ शकेल, असे या शोधनिबंधात म्हटले आहे. हे संशोधन मांडणाऱ्या शास्त्रज्ञांमध्ये कॅनडातील टोरांटोतील संशोधकांचाही समावेश आहे. संशोधकांनी सुचवलेल्या औषधाचा अनेक वर्षांपासून उपचारासाठी उपयोग केला जातो आहे.
विशेषतः वरच्या श्वसनमार्गामध्ये शोधण्यायोग्य विषाणूचा कालावधी सरासरी 7 दिवसांपर्यंत कमी केला जाऊ शकतो. रक्तातील इंटरल्युकिन-6 या इम्युन सिस्टीम मोलिक्युल आणि सी-रिऍक्टिव्ह प्रोटीनची रक्तातील पातळीही हे औषध कमी करते. त्यामुळे प्रत्येक नवीन विषाणूसाठी नवीन विषाणूरोधक औषध तयार करण्याऐवजी पूर्वी ज्ञात असलेल्या औषधांचा प्रथम वापर करावा, असे सुचवावेसे वाटत असल्याचे टोरोंटो युनिव्हर्सिटीचे अभ्यासक आणि लेखक एलोनोर फिश म्हणाले.
इंटरफेरॉनला बऱ्याच वर्षांपासून क्लिनिकल वापरासाठी मंजूर केले गेले आहे, म्हणून गंभीर तीव्र विषाणूजन्य संसर्गासाठी त्यांचा पुन्हा वापर करण्याचे धोरण स्वीकारावे लागेल,असे त्यांनी सांगितले.