पुणे – कात्रज प्राणी संग्रहालयात झालेल्या काळवीट मृत्यू प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाईचे आदेश महापौर मुरलीधर मोहोळ यांनी बुधवारी मुख्यसभेत दिले. मनसे, कॉंग्रेस तसेच राष्ट्रवादीच्या वतीने महापालिकेच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करत तातडीने चौकशीच्या मागणीसाठी कळविटाची प्रतिकात्मक तिरडी मुख्यसभेत ठेवत आंदोलन केले.
मनसेचे गटनेते वसंत मोरे, विरोधीपक्ष नेत्या दीपाली धुमाळ, माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबूराव चांदेरे, माजी सभागृह नेते सुभाष जगताप, नगरसेवक साईनाथ बाबर, युवराज बेलदरे, प्रकाश कदम यांनी हे आंदोलन केले. यावेळी काळविटाच्या तिरडीसह हरणाच्या प्रतिकृतीही यावेळी आणण्यात आल्या.
मुख्यसभा सुरू होताच मनसेच्या नगरसेवकांकडून शहरातील उद्यानांची झालेली दुरवस्थेची स्थिती मांडली. त्याचवेळी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडून काळवीटाच्या मृत्यूप्रकरणी प्रशासनाकडून अद्याप काहीच कार्यवाही केलेली नसल्याचे निदर्शनास आणून देत तातडीने चौकशी करून कारवाईची मागणी केली.
तसेच, स्थायी समितीने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देऊनही काहीच झाले नसल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्याची गंभीर दखल महापौरांनी यावेळी घेतली. तसेच, प्रशासनाकडून याबाबत देण्यात आलेल्या माहितीचा उल्लेख करत याप्रकरणी तातडीने आयुक्तांनी चौकशी करावी तसेच संबंधितांवर कारवाई करावी, असे आदेश महापौरांनी आयुक्त विक्रम कुमार यांना दिले.