पालिकेत पुन्हा ठेकेदारांचीच चलती?

नवी निविदा डावलून जुन्याच ठेकेदाराला काम

 

पुणे – महापालिकेच्या वाहनांवर चालक पुरविण्यासाठीची निविदा संपल्याने पालिका प्रशासनाने नवीन निविदा काढून त्याचा प्रस्ताव स्थायी समितीत मान्यतेसाठी आणण्यात आला होता. मात्र, हा प्रस्ताव दाखल करून न घेता समितीने आपल्या अधिकारात जुन्याच ठेकेदारास 21 दिवसांची मुदतवाढ देण्याचा घाट घातला आहे. विशेष म्हणजे नवीन प्रस्तावात त्रुटी असल्याचे सांगत उपसूचना देऊन ही मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे, पालिकेत ठेकेदारांच्याच हितासाठी काम केले जाते का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

महापालिकेने चालकांची मुदत संपल्यानंतरची काढलेली निविदा काही दिवसांपूर्वी वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. त्यामुळे प्रशासनाने संबंधीत ठेकेदाराला मुदतवाढ दिली होती. तसेच, 824 चालक पुरविण्यासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबविली होती. ही निविदाही वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. त्यानंतर प्रशासनाने या निविदा प्रक्रियेत काही बदल करून ही प्रक्रिया पूर्ण केली होती. त्यानुसार सर्वात कमीदराने निविदा भरलेल्या ठेकेदाराला काम देण्याचा प्रस्ताव मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत आयत्यावेळी मंजुरीसाठी आणला होता.

मात्र, सत्ताधारी भाजपने हा प्रस्ताव मंजुर न करता जुन्याच ठेकेदाराला आणखी तीन आठवड्यांसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. यासंबंधिची दिलेली उपसूचना मंजूर करण्यात आली. त्यामुळे प्रशासनाला मंजुरीसाठी आणलेला प्रस्ताव पुन्हा माघारी घेऊन जावा लागला. दरम्यान, मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने आपल्या अधिकारात मंजूर केला असून तो नाकारण्यात आला, याचे कोणतेही कारण देण्यात आलेले नाही. त्यामुळे मुदतवाढ संपल्यानंतर पुन्हा समिती समोर प्रस्ताव ठेवणार असल्याचे प्रशासकीय सुत्रांकडून सांगण्यात आले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.