पिंपरी- शहरातील करोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. रूपीनगर परिसरात सोमवारी (दि. ४) रात्री उशिरा आणखीन तीन करोना बाधित रुग्ण आढळल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी दै. ‘प्रभात’ला दिली.
पिंपरी चिंचवड शहरातील करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यातच रुपीनगर परिसर करोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. शहरातील आत्तापर्यंत सर्वाधिक रुग्ण हे रुपीनगर परिसरात आढळून आले आहेत. सोमवारी रात्री महापालिकेस प्राप्त झालेल्या अहवालामध्ये रुपीनगर परिसरातील आणखीन तीन रुग्ण करोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले.
शहरात आतापर्यंत १२४ करोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर सोमवारी तीन जण बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने ही संख्या १२७ वर गेली आहे. आजपर्यंत एकूण ५५ रूग्ण करोना मुक्त झाले आहेत. तर ५५ जणांवर शहरात उपचार सुरू आहेत. करोनामुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी तिघेजण शहरातील तर दोघेजण शहराबाहेरील आहे.