करोनाबाबतीत पुण्यातून आली आणखी एक चांगली बातमी

करोनामुक्तीचे प्रमाण 95% : 1 लाख 56 हजार 995 जणांची करोनावर मात

पुणे – शहरात नव्या करोना बाधितांची संख्या वाढतानाच पुणेकरांसाठी दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. महापालिका प्रशासनाच्या अहवालानुसार शहरातील करोनातून बऱ्या होणाऱ्यांचे प्रमाण 94.67 टक्क्यांवर गेले आहे. तर राज्याचा हा दर 92.75 आहे. मात्र, त्याच वेळी शहरातील करोना बाधितांचा मृत्युदर पुन्हा वाढण्यास सुरूवात झाली असून, 2.20 टक्क्यांपर्यंत खाली आलेला मृत्यूदर पुन्हा 2.66 टक्क्यांवर जाऊन पोहचला आहे.

 

महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून दि. 19 नोव्हेंबर अखेरपर्यंतच्या करोना रुग्णांचे विश्लेषण करण्यात आले आहे. त्यानुसार त्या दिवसापर्यंत सुमारे 1 लाख 65 हजार 837 जणांना करोनाची बाधा झाली असून, त्यातील 1 लाख 56 हजार 995 जणांनी करोनावर मात केली आहे. तर सुमारे 4 हजार 475 जणांचा मृत्यू झाला आहे. तर शहरातील शासकीय, खासगी रुग्णालये तसेच घरीच उपचार घेणाऱ्यांचा आकडा सुमारे 4,007 आहे.

 

शहरात गेल्या महिनाभरापासून करोनाची साथ ओसरसण्यास सुरूवात झाली होती. त्यामुळे शहरातील नवीन बाधितांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रूग्णांचे प्रमाण जवळपास दुप्पट होते. मात्र, आता बरे होणाऱ्यांच्या तुलनेत पुन्हा नव्याने सापडणाऱ्या रूग्णांचे प्रमाण तीन पट वाढले आहे.

 

पॉझिटिव्हिटी रेट 21 टक्के

महापालिकेने शहरात आतापर्यंत तब्बल 7 लाख 77 हजार 208 करोना संशयितांच्या चाचण्या केल्या असून, त्यात 1 लाख 65 हजार बाधित सापडले आहेत. चाचण्यांच्या तुलनेत हे बाधित सापडण्याचे प्रमाण सुमारे 21.34 टक्के आहे. तर त्याच वेळी गेल्या महिनाभरातील रुग्णवाढ पाहता शहरातील रुग्ण दुपटीचा कालावधी 19 नोव्हेंबरअखेर 458 इतका आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.