पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक

पुणे पदवीधर मतदारसंघात मातब्बर उमेदवारांचे लक्ष : पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून रणधुमाळी

प्रमोद ठोंबरे

बारामती – संपूर्ण राज्यात लक्षवेधी आणि तुल्यबळ ठरलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघात निवडणुकीत प्रचार शिगेला पोहोचला आहे. अर्ज माघारी घेतल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस अर्थात महा विकास आघाडीने जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे आमदार सर्वाधिक आहेत.े त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादी- कॉंग्रेसची भूमिका निणार्यक ठरणार आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघात 5 जिल्हे आणि 58 तालुके आहेत. त्यामुळे विशाल मतदारसंघात उमेदवारांकडून प्रचार करताना दमछाक होत आहे. प्रत्येक तालुक्‍याला तीन तास दिले तरी दिवसभरातून किमान चार तालुक्‍यांत प्रचार होत असताना दिसत आहे. त्यामुळे एकदा पुण्याच्या ग्रामीण भागात तर कधी शहरात तर कधी पिंपरी चिंचवडला असा प्रचाराचा कार्यक्रम ठरत आहे.

यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अरुण लाड यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. लाड हे मागील पंचवार्षिक निवडणुकीत इच्छुक होते. मात्र, त्यावेळी लाड यांची उमेदवारी डावलून सारंग पाटील यांना उमेदवारी दिली. त्यावेळी लाड यांनी बंडखोरी केल्यामुळे पाटील यांचा पराभव झाला होता. त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील बंडखोरी ही भाजपच्या पथ्यावर पडली होती. त्यामुळे भाजपचा विजय सुकर झाला होता.

गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यातील राजकीय स्थिती राष्ट्रवादीकडे झुकली आहे. सर्व सत्तास्थाने राष्ट्रवादीच्या अधिपत्याखाली आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, शिरूर, आंबेगाव, जुन्नर, मावळ तालुके राष्ट्रवादीमय झाले आहेत.

पुणे जिल्ह्याची मतदारसंख्येचा विचार करता 1 लाख 36 हजार आहे. त्यात पुणे शहरातील सर्वाधिक संख्या ही भाजपला तारणारी आहे. या मतपेढीला टक्‍कर देण्यासाठी राष्ट्रवादीला जिल्ह्यातील 13 तालुक्‍यांतील राष्ट्रवादी, कॉंग्रेस, शिवसेनेच्या मतांची गोळाबेरीज करावी लागणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा विचार करता राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस आमदारांची भूमिका निणार्यक ठरणार आहे.

जिल्ह्यात भाजप तोळामासा
पुणे पदवीधर मतदारसंघात दौंड वगळता भाजपचा विद्यमान आमदार नाही. त्यात इंदापूरचे भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी भाजपात दाखल झाल्यानंतर ते पूर्ण क्षमतेने सक्रिय झाले आहेत. शिरूरमध्ये भाजपच्या माजी आमदारांकडून जेमतेम अपेक्षा राहणार आहेत, अशी चर्चा सुरू झाली आहे.

एकंदरीत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाटील आणि कुल वगळता कोणीही प्रभाव पाडू शकणारा सक्षम नेत्यांच्या हाती सत्तासुत्रे नाहीत. त्यामुळे पुणे- पिंपरी- चिंचवड शहरातील भाजपला मिळणारे संभाव्य मताधिक्‍य कमी करण्यात राष्ट्रवादीची ग्रामीण भागात खऱ्या अर्थाने भिस्त आहे.

जिल्ह्यातील भोर- वेल्हा, मुळशी, बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, शिरूर- हवेली, जुन्नर, आंबेगाव, मावळ या विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस किती प्रमाणात सक्रिय राहणार, यावरून निकालाचा आडाखे बांधले जात आहेत.

इंदापूरच्या मताधिक्‍याकडे लक्ष
इंदापूर तालुक्‍यात 10 हजार मतदारसंख्या आहे. या तालुक्‍यात सर्वाधिक मतदारसंख्या असल्याने भाजप आणि राष्ट्रवादीची संपूर्ण ताकद इंदापूरवर एकवटली आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सूक्ष्म नियोजन करीत कार्यकर्त्यांना सूचना करीत निवडणुकीचे नियोजन केले आहे. सुशिक्षित तरूणांशी संपर्क साधला जात आहे. त्यांच्याकडून भाजपला अपेक्षा आहेत. तसेच राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे या निवडणुकीत कोणता करिष्मा दाखविणार, याकडे इंदापूर तालुक्‍याचे लक्ष लागून राहिले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.