-->

रविंद्र बऱ्हाटे आणी देवेंद्र जैन गॅंगवर आणखी एक गुन्हा

रिव्हॉल्हरचा धाक दाखवत मालमत्ता हडप करण्याचा प्रयत्न

पुणे – रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवित दमदाटी करुन मालमत्ता हडप केल्याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे, पत्रकार देवेंद्र जैन यांच्यासह अन्य 13 जणांवर हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बऱ्हाटे व त्याच्या साथीदारांविरुद्ध आतापर्यंत सहा पेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले आहेत.

याप्रकरणी सुमंत रंगनाथ देठे (58, रा. मांजरी ग्रीन, मांजरी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विविध कलमांसह महाराष्ट्र सावकारी कायदा आणि अनु जाती व अनु जमाती कायद्याखाली हा गुन्हा दाखल केला आहे. बऱ्हाटे यांच्यासह शैलेश जगताप, विशाल ढोरे, विनोद ढोरे, अस्लम पठाण, सुजितसिंह, बालाजी लोखंडे, सचिन धीवार, विठ्ठल रेड्डी, परवेश जमादार, देवेंद्र जैन, गणेश आमंदे, नितीन रामदास पवार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. बऱ्हाटे अद्याप फरार आहे.

तक्रारदार देठे यांचा मांजरी ग्रीन येथे बंगला असून त्यांचे एक हॉटेल आहे. देठे यांच्यावर एका फायनान्स कंपनीचे 80 लाख रुपयांचे कर्ज होते. ते फेडण्यासाठी फायनान्स कंपनीकडून सारखा तगादा लावला जात होता. ही संधी साधत आरोपींनी देठे यांचा मांजरी ग्रीनमधील रो हाऊस जबरदस्तीने हडपण्यासाठी कट रचला. त्यासाठी आरोपींनी त्यांना 25 लाख रुपये प्रती महिना पाच टक्के व्याजाने कर्ज दिले. त्यांनी त्यातील आतापर्यंत सव्वा अकरा लाख रुपये परत केले. तसेच त्यांच्या हॉटेलवर निवडणुक काळात जेवण करुन चार ते पाच लाख रुपयांचे बील केले. त्यानंतर कर्जाची वसुल करण्यासाठी आरोपींनी देठे यांना त्रास देणे सुरु केले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

देठे यांची मालमत्ता जबरदस्तीने नावावर करुन घेण्यासाठी आरोपींनी त्यांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून ठार मारण्याची धमकी दिली. तक्रारदार तसेच त्यांची पत्नी यांचे फोटो, अंगठे व सह्या घेऊन मालमत्ता हडप करण्यासाठी बनावट दस्त तयार केला. तसेच सार्वजनिक ठिकाणी अपमान करुन अपशब्द वापरुन शिवीगाळ केली व मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न केला आहे, असे तक्रारीमध्ये म्हटले आहे. याचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश साठे करीत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.