पुणे – नोव्हाव्हॅक्सशी भागिदारीत विकसित केलेली कोवोव्हॅक्स ही करोनावरील लस जूनमध्ये लॉंच करण्याबाबत आम्ही आशावादी आहोत, असे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी शनिवारी सांगितले. ते म्हणाले, या लसीच्या देशांतर्गत चाचण्यांसाठी आम्ही अर्ज केला आहे. इंग्लंडमध्ये केलेल्या चाचणीत ही लस 89.3 टक्के परिणामकारक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नोव्हाव्हॅक्सशी भागिदारीत आम्ही विकसित केलेल्या लशीनेही उत्तम परिणामकारकतेचा निकाल दिला आहे. आम्ही भारतात त्याच्या चाचण्या घेण्यासाठी अर्ज केला आहे. आम्ही कोव्होव्हॅक्स जून 2021 पर्यंत लॉंच करण्याबाबत आशावादी आहोत, असे ट्विट पुनावाल यांनी केले आहे.
इंग्लंडमध्ये 18 ये 84 वयोगटातील 15 हजार जणांवर केलेल्या चाचणीचे निकाल नोव्हाव्हॅक्सने गुरूवारी जाहीर केले. त्यात करोना टाळण्यात ही लस 89.3 टक्के परिणामकारक असल्याचे म्हटले आहे. ही लस करोनाच्या ब्रिटीश स्ट्रेनवरही तेवढीच प्रभावी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ही लस. दक्षिण अफ्रिकेच्या स्ट्रेनवरही उपयुक्त ठरली.
मात्र त्याचा प्रभाव काहीसा कमी होता. नोव्हाव्हॅक्सच्या इंग्लंडमध्ये घेतलेल्या चाचण्यांचा वापर इंग्लंड आणि युरोपीयन महासंघासह अन्य देशात वापरासाठी परवानगी मिळवण्यासाठी केला जाण्याची शक्यता आहे.
नोव्हाव्हॅक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टॅनले इरक म्हणाले, मे अखेर किंवा जूनमध्ये कंपनी 15 कोटी डोस तयार करण्याची अपेक्षा करत आहे. येत्या काही आठवड्यात मानवावरील चाचण्या पूर्ण केल्या जातील. मात्र त्याच्या उत्पादनाची सुरवात करण्यात आली आहे. मे महिन्यानंतर आम्ही पूर्ण क्षमतेने ऊत्पादन करू