डॉ. मेघश्री दळवी
अमेरिकेचा शोध लावणारा होता एक ख्रिस्तोफर कोलंबस. नव्या भूमीच्या शोधात निघालेला साहसवीर. तसाच धाडसी आणि आपलं क्षितीज विस्तारणारा दुसरा संशोधक म्हणजे ख्रिस्तोफर कोलंबस क्राफ्ट. नाव तेच, आणि आश्चर्य म्हणजे कामही तेच. मात्र यावेळी नव्या भूखंडाच्या शोधात नव्हे तर पार पृथ्वीची सीमा ओलांडून अवकाशात नव्या नवलाईच्या भूमीच्या शोधात.
नासामध्ये अनेक वर्षे मिशन कंट्रोलरचं पद भूषवत कित्येक महत्त्वाच्या मोहिमा पार पाडणारे ख्रिस्तोफर कोलंबस क्राफ्ट 22 जुलै रोजी आपल्याला सोडून गेले. आपल्या 95 वर्षांच्या आयुष्यात त्यांनी अवकाश संशोधनात अद्वितीय भर घातली आहे. चंद्रावर माणसाचं पहिलं पाऊल पडलं त्या अपोलो मोहिमेचे सूत्रधार तेच होते. सुदैवाने त्या घटनेला 50 वर्षे पूर्ण झाल्याचा सोहळा त्यांनी पाहिला आणि मगच या जगाचा निरोप घेतला.
अवकाशात यान पाठवणे आणि सुखरूप परत आणणे हे अतिशय खडतर काम आहे. त्यात अंतराळवीर असतील, तर अधिकच. आज तंत्रज्ञानाने प्रचंड प्रगती केली असूनही ते कठीण ठरतं, तर कित्येक वर्षांपूर्वी कधीही कोणीही न केलेलं हे धाडस करायचं, त्याकाळच्या तंत्रज्ञानाच्या जोरावर यशस्वी करून दाखवायचं म्हणजे काय दिव्य असेल! त्यामागे किती काटेकोर आखणी असेल, पदोपदी येणाऱ्या अडचणी सोडवण्याची किती जिद्द असेल आणि या सर्वांची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत, सहकाऱ्यांना आश्वस्त करत मोहीम कशी पार पाडायची असेल याची नुसती कल्पना करून पाहा! एरॉनॉटिकल इंजिनिअरिंगची पदवी घेऊन क्राफ्ट यांनी काही वर्षे विमान उद्योगात काम केलं.
पुढे 1958 मध्ये नासाची स्थापना झाल्यावर त्यांनी नासामध्ये फ्लाइट ऑपरेशनची जबाबदारी उचलली. “मिशन कंट्रोल’ ही क्राफ्ट यांचीच कल्पना. आपली कल्पना पूर्णत्वाला नेऊन त्यांनी पुढे “मर्क्युरी मिशन’मध्ये चिंपांझीला अवकाशात नेऊन आणलं, जेमिनी प्रोग्राममध्ये अंतराळवीरांना पृथ्वीभोवती भ्रमण करून परत आणलं आणि “अपोलो मिशन’च्या चांद्रमोहिमा यशस्वी करून दाखवल्या. टाइम साप्ताहिकाने ऑगस्ट 1965 मध्ये त्यांना आपल्या मुखपृष्ठावर खास स्थान देऊन गौरवलं होतं.
आपल्या कारकिर्दीत क्राफ्ट यांनी सहकाऱ्यांना नेहमीच उत्तेजन दिलं, योग्य ते प्रशिक्षण दिलं. उत्तम व्यवस्थापन ही त्यांची खासियतदेखील त्यांनी आवडीने इतरांना शिकवली. बारीकसारीक गोष्टींवर ध्यान देत योजनांची अचूक आखणी करणे आणि त्या आखणीनुसार योजना अचूकपणे पार पाडणे हे त्यांचं कसब वाखाणण्यासारखं होतं.
नंतर 1982मध्ये निवृत्त झाल्यावरही क्राफ्ट रॉकवेल, आयबीएमसारख्या तंत्रज्ञान कंपन्यांचे सल्लागार म्हणून काम करत होते. त्यांचं आत्मचरित्र “माय लाइफ इन मिशन कंट्रोल’ हे न्यूयॉर्क टाइम्सच्या बेस्टसेलर पुस्तकांच्या यादीत विराजमान आहे. त्यात त्यांनी अभिमानाने म्हटलं आहे, “ख्रिस्तोफर कोलंबस या माझ्या नावामुळे माझ्या आयुष्याची दिशा ठरल्यासारखीच होती.’ आणि त्यांनी ते नाव खरोखरच सार्थ करून दाखवलं!