मुंबई – भारताचा माजी फलंदाज व आंध्रप्रदेशचा माजी कर्णधार वेणुगोपाळ राव याने सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. आंध्रप्रदेश क्रिकेट संघटनेने एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
वेणुगोपाळ या 37 वर्षीय खेळाडूने भारताकडून एक दिवसाच्या 11 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले. 2005 मध्ये त्याने श्रीलंकेविरूद्धच्या सामन्याद्वारे आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. 2008 मध्ये त्याने वेस्ट इंडिजविरूद्धच्या सामन्यात भाग घेतला. हा त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता. त्याने 11 डावांमध्ये 218 धावा केल्या. त्यामध्ये त्याने केवळ एकच अर्धशतक केले. त्याने प्रथम दर्जाच्या 121 सामन्यांमध्ये भाग घेताना 7 हजार 81 धावा केल्या. त्यात त्याने 17 शतके व 30 अर्धशतके नोंदविली. 2008 ते 2014 या कालावधीत त्याने आयपीएल स्पर्धेत डेक्कन चार्जर्स व सनरायजर्स हैदराबाद संघाकडून भाग घेतला.