मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधातील आणखी एका प्रकरणाची चौकशी गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) वर्ग करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी केलेल्या तक्रारीची चौकशी रविवारी सीआयडीकडे वर्ग करण्यात आली.
सीआयडी याप्रकरणी सोमवारी डांगे यांचा जबाब नोंदवणार असल्याचेही वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. या प्रकरणात वर्षभरानंतरही कोणतीही प्रगती न झाल्यामुळे डांगे यांनी नाराजी व्यक्त करणारे पत्र डिसेंबर महिन्यात गृहमंत्री दिलीप वळसे यांना लिहून हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवण्याची मागणी केली होती.
गेल्या वर्षी पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी गृहविभागाचे अपर मुख्य सचिव यांना लिहिलेल्या पत्रात परमबीर सिंग यांचे पब मालकाशी असलेल्या संबंधांबाबत चौकशी करण्याची मागणी केली होती. त्या वेळी व्हॉट्स ऍप ग्रुपवर वरिष्ठांच्या विरोधात संदेश पाठवल्याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक डांगे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
या तक्रारीला वर्ष होत आले असतानाही कोणतीही पावले उचलण्यात आली नाहीत. त्याबाबत डांगे यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आता या प्रकरणाची चौकशी सीआयडीकडे वर्ग करण्यात आली आहे.