पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- मेफेड्रोन उत्पादन प्रकरणी कुरकुंभ येथील अर्थकेंम लॅबोरेटरी कंपनीचा मालक भिमाजी साबळे आणि युवराज भुजबळ यांच्या पोलीस कोठडीत दि. ४ मार्चपर्यंत वाढ करण्यात आली आहे. तर, प. बंगालमधून अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला दि. ९ मार्चपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.
साबळे आणि भुजबळ यांनी महाराष्ट्रासह देशात इतर किती ठिकाणी व किती व्यक्तींना एमडी हा अमली पदार्थ तयार करण्यासाठी लागणारा फॉर्म्युला विकला आहे. तसेच किती ठिकाणी एमडी विक्रीचे कारखाने उभे राहिले आहेत, याचा तपास करायचा आहे.
मात्र, आरोपी तपासास सहकार्य करीत नसल्याने या दोघांची पोलीस कोठडी वाढवून देण्याची विनंती तपास अधिकारी शब्बीर सय्यद यांनी न्यायालयाला केली. त्यानुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जे.एम. चौहान यांनी साबळे आणि भुजबळ यांना ४ मार्चपर्यंत तर पश्चिम बंगालहून नव्याने अटक केलेल्या सुनील बर्मन या आरोपीला ९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
बर्मन याला बुधवारी रात्री अटक करण्यात आली होती. त्याचा दिल्ली येथील आरोपी संदीप कुमार, दिवेश मुथानी, संदीप यादव, देवेंद्र यादव व पुणे येथील आरोपी हैदर शेख व पप्पू कुरेशी यांच्याशी संबंध असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अधिक तपासासाठी त्याला कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील पल्लवी काशीद यांनी केली.