पहिल्या बसला एक वर्ष पूर्ण; प्रवास होणार प्रदूषणमुक्त
पुणे – इंधनमुक्त आणि पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी पीएमपीच्या ताफ्यात दाखल झालेल्या इलेक्ट्रिक बसेसला शनिवारी वर्षपूर्ती झाली. सद्यस्थितीत देशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सर्वाधिक इलेक्ट्रिक बसेस पीएमपीएल ताफ्यात आहेत. सध्या पीएमपीच्या दैनंदिन संचलनात 118 ई-बसेस असल्याने आणखी पाचशेपेक्षा अधिक बसेस दाखल होणार आहेत. यामुळे पुढील काळात पुणेकरांचा प्रदूषणमुक्त प्रवास निश्चितपणे वाढणार आहे.
केंद्र शासनाच्या फेम इंडिया कार्यक्रमांतर्गत देशातील गुजरात, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान यासह विविध राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत ई-बसेस खरेदीसाठी अनुदान दिले जाते. पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपीएमएल) देखील इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्यावर भर देण्यात येत आहे. सध्या पीएमपीएल ताफ्यात 9 आणि 12 मीटर लांबीच्या ई-बसेसची संख्या शंभरपेक्षा अधिक आहे. यासाठी भेकराईनगर आणि पिंपरी चिंचवड शहरातील निगडी डेपो ई-आगार म्हणून विकसित करण्यात आले.
केक कापून वर्धापनदिन साजरा
इलेक्ट्रिक बसेसला पीएमपीएल ताफ्यात एक वर्ष पूर्ण झाल्याने शनिवारी पीएमपीएल अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालिका नयना गुंडे यांच्या हस्ते ई-बसेसचे छायाचित्र असलेला केक कापून वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळी, सहव्यवस्थापकीय संचालक अजय चारठाणकर, वाहतूक व्यवस्थापक अनंत वाघमारे, मुख्य अभियंता सुनील बुरसे, भेकराईनगरचे डेपो मॅनेजर नारायण कर्डे आदी उपस्थित होते.
पुढील टप्यात 350 बस दाखल होणार…
पीएमपीएल ताफ्यात लवकरच आणखी 500 बसेस दाखल होणार आहेत. यातील सुरवातीच्या टप्प्यात 350 आणि यानंतर 150 बसेस दाखल होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. या बसेस ताफ्यात दाखल झाल्यानंतर पुणे शहरात इलेक्ट्रिक बसेसची संख्या लक्षणीय होणार आहे. त्यामुळे, इंधनमुक्त व प्रदूडणमुक्त प्रवास शक्य होणार असल्याचे, पीएमपीएल प्रशासनाने सांगितले. प्रवाशांकडून बसेसचे स्वागत होत असल्यानेच बसची संख्या वाढविली जात आहे.