पिंपरी – पदपथ, नो-पार्किंग आणि रहदारीस अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर सोमवारपासून (दि. 21) कारवाई करण्यात येणार असल्याची घोषणा महापालिकेने केली होती. त्यासाठी चार टोईंग व्हॅनही वाहतूक पोलिसांना देण्यात आल्या आहेत. मात्र वाहतूक पोलिसांना याबाबत काहीच आदेश नसल्याने कारवाईसाठी महापालिकेने केलेला सोमवारचा मुहूर्तही हुकला आहे.
शहरात पार्किंग पॉलिसी राबविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. त्यानुसार ठिकठिकाणी “पे ऍण्ड पार्क’ सुरू करण्यात आले. मात्र बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई होत नसल्याने या योजनेचा शहरात फज्जा उडाला. अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने काही जणांनी पे ऍण्ड पार्कचे काम थांबविले. महापालिका आयुक्त राजेश पाटील आणि पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची महापालिका भवनात संयुक्त बैठक झाली. या बैठकीत महापालिकेने टोईंग व्हॅन उपलब्ध करून दिल्या वाहतूक पोलीस बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करतील, असे ठरले.
त्यानुसार महापालिकेने टोईंग व्हॅन मालकांशी करार करून 1 मार्च पासून चार टाईंग व्हॅन वाहतूक पोलिसांना उपलब्ध करून दिल्या आहेत. या टोईंग व्हॅन सध्या चिंचवड वाहतूक पोलीस विभाग या ठिकाणी 21 दिवसांपासून उभ्या आहेत. महापालिकेने बेशिस्त वाहन चालकांवर कारवाईसाठी 21 मार्च ही तारीख जाहीर केली होती. मात्र या दिवशी वाहतूक पोलिसांकडून ठरल्याप्रमाणे एकही कारवाई झालेली नाही. तसेच कारवाई लवकर होणार नसल्याने महापालिकेला टोईंग व्हॅनसाठी पैसे मोजावे लागत आहेत.
पहिल्या दिवशी एकाही वाहनावर कारवाई नाही : चार टोईंग व्हॅन 21 दिवसांपासून धूळखात
वाहतूक पोलिसांनी कारवाईसाठी परिपत्रक काढणे आवश्यक आहे. मात्र असे परिपत्रक वाहतूक पोलिसांच्या नियोजन विभागाकडून काढण्यात आलेले नाही. तसेच पुणे पोलिसांच्या धोरणानुसार बेशिस्त वाहन चालकांवर कारवाईचा निर्णय घेण्यात आला. पुणे महापालिका, वाहतूक पोलीस आयुक्त टोईंग व्हॅन मालक यांच्या तब्बल 61 पानांचा करारनामा झाला आहे. यामध्ये कारवाई करताना टोईंग व्हॅनवरील कर्मचाऱ्यांनी कारवाई करण्यापूर्वी 360 अंशामध्ये वाहनाचे फोटा काढणे, वाहन उचलताना नुकसान झाल्यास ते कोणी भरून द्यायचे याबाबत सविस्तर म्हणणे करारात आहे. मात्र पिंपरी चिंचवड महापालिकेने केवळ एका पानाचा करारनामा केला असून त्यात अनेक गोष्टींचा समावेश नाही.