विचार: अंगण

अमोल भालेराव

सर्व सामान व्यवस्थित भरलंय का? मी वरच्या माळ्यावर जाऊन पाहतो, काही राहिलं तर नाही ना? लवकर आवरा, थोड्याच वेळात गाडी येईल.” विनयचं कुटुंब नवीन फ्लॅटमध्ये शिफ्ट होणार होतं, त्यांची ही लगबग. काव्याने आवाज दिला, “दादा थांब मी पण तुझ्या मदतीला येते.” वर माईंनी आधीच खोलीतील देवघर आणि इतर सामान एका पेटीमध्ये भरून ठेवलं होतं. “माई, आम्ही आहोत ना, तू कशाला त्रास करून घेतेस. बरं, तुझी ही पेटी मी खाली घेऊन जातो. तू काव्यासोबत खाली ये.” काव्याने खोलीचे दार लावून घेतले. एका हाताने काव्याला धरत तर दुसऱ्या हाताने जिन्याचा आधार घेत खाली उतरणाऱ्या माईंची पावलं आज जड झाली होती. जिना उतरून खाली येताच माईने मागे वळून पहिले.
पायऱ्यांवरून नजर फिरवताना तिला ‘माझी वेणी घाल’ म्हणून हट्ट करून बसलेली लहानपणीची काव्या दिसत होती तर, ‘माई तू तुझ्या नातीची वेणी घाल आणि मी तुझी घालते.’ असं म्हणत वरच्या पायरीवर बसलेली आपली मुलगी. माई अजूनही जिन्याकडं एकटक पाहात उभी होती.

कळत नव्हतं, नक्की कुणी कुणाला धरून ठेवलं होतं ! धावपळ करून सारे दमले होते. व्हरांड्यातील रिकाम्या खुर्चीकडं पाहताच विनयने आवाज दिला,”माई, आण्णा कुठेत?” आण्णा विनयचे बाबा. अंगणात एका कोपऱ्यात ठेवलेल्या रांजणाजवळ आण्णा उभे होते. थोडासा शेवाळलेल्या आणि पाणी झिरपत असलेल्या रांजणातून आण्णांनी थोडं पाणी बादलीत काढून घेतलं. तळहातावर थोडं पाणी घेत ते आपल्या तोंडावर शिंपडलं आणि नंतर आपल्या धोतराचा एक कोपरा धरून ते पुसून घेत, एक एक पाऊल टाकत मोगऱ्याच्या झाडाजवळ जाऊन त्याला पाणी घालू लागले. पहाटे उठून झाडाखाली पडलेली फुलं गोळा करून माईंच्या हाती देताना ते नेहमी म्हणायचे, “तुझ्या देवाला सांग बरं, ही फुलं मी वेचलीत त्याच्यासाठी, तर त्याला म्हणावं माझ्या ओंजळीत पण थोडंसं पुण्य पडू दे.” माई फक्‍त हसायची.

आमच्या आण्णांनी कुंपण म्हणून दगडांची एक छोटी भिंत उभी केली होती. आण्णा त्या भिंतीजवळ जाऊन उभे राहिले. कुठचा तरी एक दगड निखळून खाली पडला होता. तो उचलायला म्हणून ते खाली वाकले आणि कसाबसा तो दगड उचलून पुन्हा त्या भिंतीवर रचला. काही झालं तरी भिंत ढासळू द्यायची नाही, ती एकसंध ठेवायची अशी ताकीदच जणू आण्णांनी त्या दगडाला दिली असावी. आण्णांचा या अंगणातल्या प्रत्येक वस्तूवर जीव जडला होता. शेणाने सारवून घेतलेल्या अंगणाकडे पाहताना विनय भूतकाळात हरवून गेला. लहानपणी आई अंगण सारवून घ्यायची आणि शाळा सुटली की त्याच अंगणात कधी लगोरी, कधी गोट्या खेळताना, तर कधी भोवरा गोलगोल फिरताना बिचाऱ्या अंगणाच्या शरीरावरची जणू खपलीच काढायचा. आणि मग काय आईचा मार खाण्यापासून वाचायचं तर माईचा पदर होताच, तशी माई पण आम्हाला जवळ घेत, ‘जाऊ दे गं पोरं लहान आहेत’ म्हणत सारवासारव करायची. रात्री चांदण्यांच्या मंद प्रकाशात अंगणात जेवायला बसलेली पंगत आजही डोळ्यासमोर दिसत होती. एवढ्या दुरून आम्हाला पाहणाऱ्या त्या चंद्रालाही जणू आमचा हेवा वाटावा.

पण हो, कोजागिरीला मात्र चुलीवर मांडलेल्या दुधात डोकावत हे चांदोबा त्या दिवशी आमच्या पंगतीला आवर्जून बसायचे. कित्येकदा एखाद्या शुभकार्यासाठी जमलेल्या पाहुण्यांना वाड्यात जागा अपुरी पडली कि हे अंगण त्यांना सामावून घेताना उशिरापर्यंत त्यांच्या गप्पागोष्टी ऐकताना स्वतःही जागं राहायचं..! अंगणात माईच्या मांडीवर डोकं ठेवून, आकाशाकडं पाहात गोष्टी ऐकताना मधेच एखादा तारा तुटला की, त्याला पाहून काही मागितलं तर मनातल्या इच्छा पूर्ण व्हायच्या म्हणून,’उद्या शाळेला सुट्टी मिळू दे’ हे मागणं ऐकून आण्णा आणि माई दोघंही हसायचे.”माई तू काय गं मागितलंस ?” यावर माई आमच्या तोंडावरून हात फिरवत म्हणायची,’माझं हे अंगण असंच सुखानं भरून राहू दे.’ त्यावेळेस ‘एव्हढंसच’ वाटलेल्या माईच्या मागण्याचा अर्थ आज कळत होता. बाहेर गाडी येऊन थांबली होती. गाडीत सामान भरून झालं. आम्ही सारे बाहेर उभे होते. आण्णा आणि माई हाताला धरून हळूहळू अंगणातून चालत येत होते. फाटकाजवळ येताच माई जरा थबकली. आपली पाठ फिरवत वाड्याकडं आणि अंगणाकडं डोळे भरून पाहताना हात जोडत नमस्कार केला. आण्णांनी बाहेर येताच फाटक बंद करून घेतलं. आज खरं तर त्या ‘अंगणाला’ पोरकं करत आम्हाला अनाथ झाल्यासारखं वाटत होतं.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)