अन्‌ “त्या’ तान्हुल्यांना ससूनमध्ये मिळाले “आईचे दूध’

पुणे: भल्या पहाटे पाषाण तलावाजवळ तान्हुल्या बाळांच्या रडण्याचा आवाज ऐकू आला, परंतू आवाज कोठून येतोय या विचाराने सुरक्षारक्षकांनी शोध सुरू केला. त्यावेळी एका कचरापेटीत दोन जिवंत तान्हुले बाळ एकाच कापडामध्ये गुंडाळलेले दिसून आले. हृदय पिळवटून टाकणारे हे दृश्‍य पाहताच, सुरक्षारक्षकांनी 108 क्रमांकावर फोन करून दोन्ही बाळांना ससून रुग्णालयात आणले. रुग्णालयाने तत्काळ उपचार करत, दुधासाठी रडत असलेल्या त्या दोन्ही तान्हुल्यांना ससूनच्या दुग्धपेढीतून “आईचे दूध’ दिले आणि बाळ शांत झाले. दोघांची प्रकृती चांगली असून, “एनआयसीयू’मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सुतारवाडी येथील पाषाण लेक परिसरात असलेल्या एका कचऱ्याच्या डब्यामध्ये स्त्री जातीचे आणि पुरूष जातीचे असे दोन नवजात अर्भक सुरक्षारक्षकांना आढळून आले. त्यांनी तात्काळ दोन्ही बाळांना घेऊन रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. डॉ. कविता नरोले आणि सचिन रणपिसे यांनी अर्भक रुग्णवाहिकेत घेऊन पुढील उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, हे दोन्ही अर्भक चार दिवसांचे असून, जुळे असण्याची शक्‍यता आहे. साधारण आठव्या महिन्यात बाळांत झाल्यामुळे आणि पूर्ण वाढ झाली नाही, असे समजून त्या मातेने दोन्ही अर्भक टाकून दिले असावे अशी शक्‍यता आहे. यातील स्त्री जातीच्या अर्भकाचे वजन 1.9 कि. ग्रॅ., तर पुरूष अर्भकाचे वजन 2.5 किलो आहे. हृदयाचे ठोकेही व्यवस्थित असून, त्यांच्या शरिरावर कोणतेही व्रण नसून, दोन्ही बाळांची प्रकृती चांगली असल्याची माहिती ससून रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय तावरे यांनी दिली.


मातृदुग्ध पेढी ठरतेय आईची माया देणारी
चार दिवसांच्या दोन्ही बाळांना गाईचे दूध दिल्याचे दिसून आले. मात्र, अनेकवेळ दूध न मिळाल्यामुळे रडत असलेल्या बाळांना ससून रुग्णालयाने मायेचा आसरा देत मातृदुग्ध पेढीतून “आईचे दूध’ पाजले. त्यामुळे दोन्ही मुले शांत झाली असून, खऱ्या अर्थाने मातृदुग्ध पेढी या अनाथ, नवजात बालकांसाठी आईची माया देणारी ठरत आहे. डॉक्‍टरांच्या देखरेखीखाली दोन्ही बाळांवर उपचार सुरू असून, त्यांचे पुरेसे वजन होईपर्यंत आणि त्यानंतरही दुग्धपेढीतून दूध दिले जाणार आहे, अशी माहिती ससून रुग्णालय व बै.जी. शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी दिली. 

Leave A Reply

Your email address will not be published.