पुणे -“हिंदू महासंघाचे आनंद दवे यांचा प्रचार आता एका पक्षाच्या बाजूने, तर एक पक्षाविरुद्ध अशा पद्धतीने सुरू आहे. हिंदू महासंघ जिंकावा म्हणून हा प्रचार सुरू नसून, भाजपच्या हेमंत रासने यांच्याविरोधात सुरू आहे,’ असा आरोप हिंदू महासंघाचे कार्यकारिणी सदस्य आणि ब्राह्मण महासंघाचे उपाध्यक्ष रोहित धोत्रे यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी तांबोळी उपस्थित होते.
“प्रचार पुढे गेला, तसा दवे यांनी एकांगी प्रचार सुरू केला आहे. त्यांच्याकडून महाविकास आघाडीचा अजेंडा “फॉलो’ होत आहे, असे लक्षात आले. त्यामुळे मी या प्रचारातून बाजूला होत आहे. त्यामध्ये हिंदू महासंघाचे कितीजण माझ्या पाठिशी येतील माहिती नाही. असे सांगत दवे केवळ भाजपचा उमेदवार पडावा म्हणून हा प्रचार सुरू असे,’ धोत्रे यांनी सांगितले.
“वेगळे न लढता एकत्र लढवू अशी विचारणा भाजपने प्रचारकाळात केली होती. परंतु, हिंदु महासंघाने हा प्रस्ताव धुडकावला होता. पदाधिकाऱ्यांना विचारात न घेणे, भाजपचा हिंदू मतदार तोडणे अशा पद्धतीचा प्रचार सुरू आहे. त्यामुळे दवे यांचा प्रचार करणे थांबविला आहे,’ असेही धोत्रे यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, या आरोपांनंतर दवे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी “प्रभात’ प्रतिनिधीने त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. मात्र, “मी प्रचारात आहे. त्यामुळे सध्या अधिक बोलू शकत नाही,’ असे सांगत दवे यांनी अधिक प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.