पुणे -“निवडणूक आयोग सध्या पक्षपाती निर्णय घेत आहे. राज्यघटनेला अनुसरून निर्णय घेतले जात नाहीत,’ असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. या राजवटीला विरोध करण्यासाठी सर्वांनी सतर्क राहून कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना विजयी करावे,’ असे आवाहनही पवार यांनी केले.
धंगेकर यांच्या प्रचारार्थ सावित्रीबाई फुले स्मारक येथे आयोजित अल्पसंख्याक मेळाव्यात शरद पवार बोलत होते. यावेळी धंगेकर यांच्यासह खासदार ऍड. वंदना चव्हाण, आमदार चेतन तुपे, माजी राज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी आदी उपस्थित होते. यावेळी विविध संघटनांनी धंगेकर यांना पाठिंबा जाहीर केला. धंगेकर हे मेहनती, समाजाचे प्रश्न सोडविण्याची जाण असणारे, सामाजिक बंधुता व एकोपा टिकवण्यासाठी काम करणारे आहेत, असेही पवार म्हणाले.
धंगेकर म्हणाले, “मी तीस वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम केले. पाच वेळा नगरसेवक म्हणून नागरिकांची कामे केली. याची दखल घेत मला महाविकास आघाडीने उमेदवारी दिली, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो.’ यावेळी रमेश बागवे, प्रशांत जगताप यांचीही भाषणे झाली. माजी नगरसेवक अविनाश बागवे यांनी सूत्रसंचालन केले.
सुषमा अंधारे यांची सभा
“कसब्यातील अनेक प्रश्न सुटलेले नाहीत. त्यामुळे सामान्यांचे प्रश्न सामान्य माणूसच सोडवू शकतो,’ त्यासाठी रवींद्र धंगेकर यांना विजयी करा, असे आवाहन सुषमा अंधारे यांनी केले. धंगेकर यांच्या प्रचारार्थ दांडेकर पूल परिसरात ही सभा पार पडली. यावेळी आमदार संग्राम थोपटे, माजी मंत्री सुनिल केदार, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रिया गदादे, सुनील शिंदे, शिवा मंत्री, बाळासाहेब ओसवाल, रुपाली ठोंबरे आदी उपस्थित होते.
विजय वडेट्टीवार यांचेही भाष्य
तर, कॉंग्रेस नेते माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही धंगेकर यांच्या प्रचारार्थ पत्रकार परिषद घेत स्थानिक प्रश्नांवर भाष्य केले. यावेळी प्रदेश कॉंग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश कॉंग्रेस ओबीसी सेलचे अध्यक्ष भानुदास माळी, कॉंग्रेसचे निरीक्षक संजय राठोड आदी उपस्थित होते.
प्रणिती शिंदे यांची पदयात्रा
धंगेकर यांच्या प्रचारार्थ आमदार प्रणिती शिंदे यांनी महात्मा फुले वाडा, समाताभूमी येथे वंदन करून सकाळी प्रचार पदयात्रेस प्रारंभ केला. त्यांच्यासोबत महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस अध्यक्षा विद्या चव्हाण, प्रदेश कॉंग्रेस कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील, प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे, माजी राज्यमंत्री रमेश बागवे, राष्ट्रवादीच्या मृणालिनी वाणी, अजित दरेकर आदी उपस्थित होते.