नेवासा दि.१५ (प्रतिनिधी) – नेवासा फाट्यानजिक असलेल्या नेवासा खुर्द प्रभागातील आहिल्यानगर परिसरात असलेल्या नेवासा तहसीलदार यांच्या निवासस्थानाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या नेवासारोड – नेवासा फाट्यानजिक पुर्ववैमनस्यातून दोन जणांमध्ये झालेल्या राड्यातून एकाने गोळी झाडण्याची तर दुसऱ्याकडून डोक्यात बाटली फोडल्याची घटना शुक्रवार (दि.१५) रोजी सात वाजेच्या दरम्यान घडली आहे.
आहिल्यानगर येथे गोळीबार झाल्याची घटना घडल्यानंतर शहरासह तालुक्यात चर्चेला मोठे उधाण आलेले होते या घटनेची खबर मिळताच नेवासा पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक विजय करे काही मिनीटातच पोलिस फौजफाट्यासह आहिल्यानगर येथे घटनास्थळी दाखल झाले आहेत.
याबाबत चर्चेतून समजलेली अधिक सविस्तर माहीती अशी,आहिल्यानगर परिसरात एका टायर पंचर दुकानासमोर दोन युवक उभे होते.त्यातील एका जणाने दोन वेळा गोळीबार केला.या गोळीबारात सुदैवाने कोणीही जखमी झालेले नसून गोळीबार होण्याच्यापुर्वी एका जणाच्या डोक्यात दारुची बाटली फोडून जखमी केल्याची घटना घडलेली आहे. ही घटना नेमकी कोणत्या कारणावरुन झाली याचा उलगडा पोलिस तपासात निष्पण होणार असला तरी या याबाबत पोलिस अद्यापपर्यंतही घटनास्थळी असल्यामुळे गोळीबाराचे नेमके कारण समजू शकलेले नाही याबाबत रात्री उशीराने गुन्हा दाखल होण्याची शक्यता असून यातील जखमी युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची चर्चा घटनास्थळी सुरु होती.