मुंबई – मुंबईतील पवई परिसरात एका 23 वर्षीय एअर होस्टेसची गळा चिरून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी इमारतीत साफसफाईचे काम करणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे. रुपल ओग्रे असे हत्या करण्यात आलेल्या एअर होस्टेसचे नाव आहे. मरोळ मारहाव रोडवर असलेल्या एन जी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये ती राहत होती. ती मूळची छत्तीसगडची असून एप्रिलमध्ये एअर इंडियामध्ये प्रशिक्षणासाठी मुंबईत आली होती. राहत्या घरी मध्यरात्री तिचा मृतदेह सापडला. गळा चिरुन तिची हत्या करण्यात आली होती. याची माहिती मिळताच पवई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करुन तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला. या प्रकरणात इमारतीमध्ये साफसफाईचे काम करणाऱ्या इसमाला पवई पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस त्याची चौकशी करत आहेत. चौकशीअंती हत्येचे मूळ कारण समोर येईल. रूपल बहिण आणि मित्रासोबत राहत होती, परंतु ते दोघे आठ दिवसांपूर्वी गावाला गेले होते.