नवी दिल्ली- 11 वर्षांच्या अल्पवयीन मुलाच्या हत्येने देशाची राजधानी दिल्ली हादरली आहे. मुलाचा मृतदेह घरातल्याच बेडमध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली त्यानंतर आता या प्रकरणाने एक नवे वळण घेतले आहे. लग्नाला नकार देणाऱ्या बॉयफ्रेंडला धडा शिकवण्यसाठी तरूणीने त्याच्या मुलाचा जीव घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एवढंच नाही तर कोणाला कळू नये यासाठी तिने बेडमध्ये मृतदेह लपवला. मात्र 300 सीसीटीव्हीच्या तपासातून हत्याकांड उघडकीस आले आहे.
दिल्लीतील इंद्रपुरी परिसरात एका महिलेने 11 वर्षीय दिव्यांशची (बिट्टू) गळा घोटून हत्या केली. त्यानंतर चिमुकल्या बिट्टूचा मृतदेह बेडमध्ये लपून ठेवला. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी 24 वर्षीय पूजाला अटक केली आहे.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसर, बॉयफ्रेंडने केलेल्या फसवणुकीमुळे पूजाच्या मनात प्रचंड राग होता. त्यामुळे पूजाने रागाच्या भरात चिमुकल्या बिट्टूची हत्या केली. 10 ऑगस्ट रोजी दुपारी बिट्टू घरात झोपला होता. त्यावेळी पूजाने त्याचा गळा आवळून हत्या केली आणि त्याचा मृतदेह बेडमध्ये लपून ठेवला.
पूजा आणि जितेंद्र 2019 पासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. जितेंद्रने आपल्या पत्नीला घटस्फोट देऊन लग्न करण्याचे वचन पुजाला दिले होते. परंतु 2022 साली जितेंद्र पूजाला सोडून आपल्या पत्नीकडे परतला आणि पत्नी आणि मुलासोबत राहायला लागला. या सगळ्या प्रकारानंतर पूजा चिडली होती. जितेंद्रचा राग तिच्या मनात होता. पूजा आणि जितेंद्रच्या नात्यामध्ये बिट्टू येत असल्याने जितेंद्र लग्नाला विरोध करत आहे असे पूजाला वाटत होते. त्यामुळे त्याला धडा शिकवण्यासाठी पुजाने हे पाऊल उचलले.