पिंपरी – मालकाच्या गाडीवर लघुशंका करू नको, असे सांगणाऱ्या सुरक्षा रक्षकाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. हा धक्कादायक प्रकार भोसरी एमआयडीसीतील एस. व्ही. एटरप्रायझेस या कंपनीत मंगळवारी (दि. 17) दुपारी घडला.
भगवान शंकर वायफळकर (वय 41, रा. दत्तनगर, चिंचवड) असे गंभीररित्या भाजलेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव असून त्यांनी मंगळवारी (दि. 17) याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महेंद्र बाळू कदम (वय 31, रा. बालाजीनगर, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी वायफळकर हे भोसरी एमआयडीसीतील एस. व्ही. एटरप्रायझेस या कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात.
मंगळवारी दुपारी सव्वाचार वाजताच्या सुमारास आरोपी कदम हा फिर्यादी काम करीत असलेल्या कंपनीच्या मालकाच्या कारवर लघुशंका करीत होता. त्यास वायफळकर यांने येथे लघुशंका करू नको, असे सांगितले.
या कारणावरून चिडलेल्या आरोपी कदम याने फिर्यादी वायफळकर यांच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना पेटवून दिले. या घटनेत वायफळकर हे गंभीररित्या भाजले आहेत. पोलीस उपनिरीक्षक गिरनार याबाबत अधिक तपास करीत आहेत.