मुंबई – मागील काही दिवसांपासून मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार प्रेमाची कबुली देत असल्याचे दिसत आहे. प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या नात्याची कबुली दिली होती. त्यानंतर अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने इंडियन आयडॉल 12 फेम आशिष कुलकर्णीला डेट करत असल्याची कबुली दिली. यानंतर आता अभिनेता प्रसाद जवादे आणि अभिनेत्री अमृता देशमुख यांनी देखील सोशल मीडियावर नात्याची कबुली दिली आहे. इतकेच काय तर त्यांनी लग्नाची तारीख देखील जाहीर केली आहे.
अभिनेत्री अमृता देशमुखने इंस्टाग्रामवर प्रसाद जवादेसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. सोबतच तिने पोस्टमध्ये लिहिले की, ‘आम्ही एंगेज आहोत. आम्ही नामनिर्देशित कायमस्वरूपी टीम मेंबर म्हणून एकमेकांना अधिकृत करत आहोत आणि आमच्या मार्गात येणाऱ्या कोणत्याही कार्याला सामोरे जाण्यासाठी आम्ही तयार आहोत.’ अमृताने शेअर केलेल्या तीन फोटोंपैकी पहिल्या फोटोत तिने साखरपुडा रिंग दाखवत साखरपुडा झाल्याचे सांगितले. याशिवाय तिने लग्नाची तारीख देखील सांगितली आहे. 18 नोव्हेंबर 2023 रोजी प्रसाद आणि अमृता विवाह बंधनात अडकणार आहे.
View this post on Instagram
अमृताच्या पोस्टनंतर दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बिग बॉस मराठी 4 च्या पर्वामध्ये घरात प्रसाद आणि अमृताची केमिस्ट्री अनेकांच्या पसंतीस पडली होती. बिग बॉसच्या घरा बाहेर पडल्यानंतरही त्यांनी आपले नाते चांगले ठेवले. अखेर आता त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, कलर्स मराठीवर ‘काव्यांजली – सखी सावली’ या मालिकेत प्रसाद जवादे झळकत आहे.