मुंबई – बॉलिवूडचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांचा फिल्म शूटिंग दरम्यान काही दिवसांपूर्वी अपघात झाला. स्वतः बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमधून ही माहिती दिली होती. या अपघातादरम्यान बिग बी गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर प्रकृती सुधारणा होत असल्याची माहिती अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांना दिली होती. मात्र आता बिग बींची प्रकृती पूर्णपणे ठीक होण्यासाठी आणखी काही दिवसांचा वेळ लागणार असल्याची माहिती मिळत आहे.
अपघातानंतर अमिताभ बच्चन अनेक दिवसांनी कामावर परतले होते. अमिताभ बच्चन यांनी पुन्हा शुटिंगला सुरुवात केल्याने चाहते देखील आनंदी झाले होते. त्यामुळे ते ठणठणीत बरे झाल्याची चर्चा रंगली होती. मात्र आता अमिताभ बच्चन यांची प्रकृती पूर्णपणे ठीक झाली नसल्याची माहिती त्यांच्या मित्राने दिली आहे.
“बिग बींना लवकरच पुन्हा शूटींग सुरु करण्याची इच्छा आहे. पण वयामुळे त्यांच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा होत आहे. त्यांची प्रकृती ठिक होण्यासाठी आणखी थोडा वेळ लागू शकतो”, असे त्यांच्या जवळच्या मित्राने सांगितले आहे. एका वृत्तवाहिनीकडून ही माहिती देण्यात आली आहे.
कधी झाला होता अपघात ?
अमिताभ ‘प्रोजेक्ट के’ या चित्रपटाच्या अॅक्शन सीनचे शूटिंग करत असताना ही घटना घडली होती. अपघातानंतर चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले होते. त्यानंतर हैदराबादमध्ये उपचार घेतल्यानंतर बिग बी मुंबईतील त्यांच्या घरी परतले आहेत. या अपघातानंतर चित्रपटाचे शूटिंग काही काळासाठी थांबवण्यात आल्याचे समजते. आता ही शूटिंग आणखी काही दिवस लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, बिग बी लवकरच ‘प्रोजेक्ट के’ सह ‘सेक्शन 84’मध्ये दिसणार आहेत. तसेच ते ‘गणपत’, ‘घूमर’, ‘द उमेश क्रॉनिकल्स’ आणि ‘बटरफ्लाय’ यांसारख्या चित्रपटांमध्ये पाहायला मिळणार आहे.