मुंबई – मुंबईच्या वाहतूक कोंडीमुळे लोकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. तासन् तास ट्रॅफिकमध्ये अडकल्याने लोकांची सर्व कामे खोळंबतात. मुंबई उपनगरातील वाढती रहादरी हे त्यामागचे कारण आहे. मात्र तरीही वाहतूक नियोजनकडे पूर्णत: दुर्लक्ष केले गेल्याचे दिसते. मुंबईच्या ट्रॅफिकचा फटका बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन यांना देखील बसला आहे. अमिताभ बच्चन हे हजरजबाबी आहेत. ते नेहमीच दिलेल्या वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचतात. त्यांचा हाच अंदाज अनेकांना आवडतो.
अमिताभ बच्चन यांना ‘प्रोजेक्ट के’ या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला जाण्यासाठी वेळ झाल्याने त्यांनी ट्रॅफिकमधून बाहेर पडण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या बिग बींनी रस्त्यावर एका अनोळखी दुचाकीस्वाराकडे मदत मागितली. त्या व्यक्तीच्या बाइकवर बसून ते सेटवर वेळेत पोहोचले. याचा फोटोसुद्धा त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
आमिताभ बच्चन यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये ते त्या व्यक्तीच्या बाइकच्या मागे बसलेले दिसत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी या दुचाकीस्वाराचे आभार व्यक्त करत लिहिले की, ‘या प्रवासासाठी धन्यवाद मित्रा. मी तुला ओळख नाही, पण तू मला सेटवर वेळेत पोहोचण्यास मदत केली. या ट्रॅफिक जॅममधून तू तुझं काम जलदगतीने केलंस. पिवळा टी-शर्ट, शॉर्ट्स आणि कॅपचा मालक, तुझे आभार!’
या पोस्टवर नेटकरी कमेन्ट करत बिग बींचे कौतुक करत आहेत. ‘तुमचा वक्तशीरपणा आम्हाला नेहमीच प्रेरणा देत राहील,’ असे एका नेटकऱ्याने म्हंटले आहे. तर काही जणांनी त्यांना हेल्मेट घालण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांना ‘प्रोजेक्ट के’ या आगामी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दुखापत झाली होती. मात्र काही काळ आराम केल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली आहे. बिग बी ‘प्रोजेक्ट के’ सह ‘बटरफ्लाय’ या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.