वॉशिंग्टन: अमेरिकेतील भारतीय दूतावासाबाहेरील महात्मा गांधींच्या पुतळ्याची आज काही अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड केली. तसेच स्प्रे पेंटिंगच्या माध्यमातून या पुतळ्याजवळ ग्राफिटीही रेखाटली गेली आहे. याविरोधात भारतीय दूतावासाने स्थानिक प्रशासकीय कार्यालयामध्ये तक्रार दाखल केली आहे.
अमेरिकेत 25 मे रोजी मिनियापोलीस इथे पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या क्रूर मारहाणीदरम्यान जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर जो देशव्याप्ती भडका उडाला त्या दरम्यानच या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. 2 ते 3 जूनच्या दरम्यान हा प्रकार घडला असण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.
बुधवारी महानगर पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी डिप्लोमॅटिक सिक्युरिटी सर्व्हिस आणि नॅशनल पार्क पोलिसांबरोबर चर्चा करून घटनास्थळाची पाहाणी केली. या परिसराची लवकरात लवकर स्वच्छता करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
या प्रकाराबद्दल भारतातील अमेरिकेचे राजदूत केन जस्टर यांनी भारताकडे दिलगिरी व्यक्त केली आहे.
अमेरिकेत उसळलेल्या निषेध आंदोलना दरम्यान डझनभर शहरांमध्ये जाळपोळ, लुटालूट आणि दगडफेकीचे प्रकार घडत आहेत. वॉशिंग्टनमध्ये आंदोलकांनी ऐतिहासिक चर्चला आग लावली आणि काही महत्त्वाच्या इमारतींनाही पेटवून दिले. त्यामध्ये राष्ट्रीय स्मारके आणि लिंकन संग्रहालयाचाही समावेश आहे.