वॉशिंग्टन – इराणच्या ताब्यात असलेल्या पाच अमेरिकन नागरिकांच्या सुटकेसाठी अमेरिकेने इराणला तब्बल 49 हजार कोटी रुपयांचा निधी देण्याचे डील केले आहे. कतार या देशाच्या माध्यमातून ही प्रचंड रक्कम अमेरिका इराणला देणार आहे. न्यूयॉर्क टाइम्सने याबाबतचे वृत्त दिले असून हे डील अंतिम झाल्यानंतर इराणने आपल्या कुख्यात जेलमधून या पाच अमेरिकन नागरिकांची सुटका केली असून त्यांना अन्यत्र हलवले आहे.
इराणच्या ताब्यात असलेल्या या पाच नागरिकांच्या सुटकेचा मुद्दा गेली अनेक वर्ष इराण आणि अमेरिका यांच्यातील संबंधांमधील बाधा बनला होता. या कारणावरून अमेरिकेने इराणला दिली जाणारी 49 हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत रोखली होती. या नागरिकांची सुटका करण्यात यावी यासाठी या नागरिकांच्या नातेवाईकांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यावर मोठ्या प्रमाणात दबाव टाकण्यास सुरुवात केली होती.
या नागरिकांच्या सुटकेचे डील अंतिम झाल्यानंतर तब्बल 49 हजार कोटी रुपये अमेरिका कतारच्या सेंट्रल बॅंकेत ट्रान्सफर करणार आहे. त्यानंतर काही कालावधीनंतर हा निधी इराणच्या खात्यात जमा होऊ शकतो. त्यासाठी काही कालावधी जाणार असला तरी त्यापूर्वीच्या अमेरिकन नागरिकांना मायदेशी पाठवले जाऊ शकते. इराणने काही वर्षांपूर्वी अमेरिकेशी केलेला आण्विक करार रद्द केल्यानंतर अमेरिकेने इराणवर आर्थिक निर्बंध लागू केले होते.
त्यामुळे जगातील अनेक देशांमध्ये इराणला दिली जाणारी मदत गोठवण्यात आली आहे. इराणची जी आर्थिक मदत गोठवण्यात आली आहे तो आकडा तब्बल 41 लाख कोटी रुपये एवढा आहे. काही वर्षांपूर्वी इराणने आपला आण्विक कार्यक्रम राबवण्यासाठी अमेरिकेसह रशिया, फ्रान्स, इंग्लंड आणि जर्मनी या देशांबरोबर आण्विक करार केला होता.
पण काही कालावधीनंतर इराण आणि अमेरिका यांच्यातील संबंध बिघडल्यानंतर इराणने या करारातून अमेरिकेला बाजूला केले होते. त्याचा राग येऊन अमेरिकेने इराणवर आर्थिक निर्बंध जारी केले होते. त्याचा फटका गेले कित्येक वर्ष इराणला बसत आहे. याच रागातून इराणने काही अमेरिकन नागरिकांना आपल्या ताब्यात ठेवले होते. आता या नागरिकांच्या सुटकेच्या बदल्यात अमेरिकेने इराणला 49 हजार कोटी रुपयांची ही आर्थिक मदत दिली आहे.