मनसेच्या खळखट्याकनंतर ऍमेझॉनची माघार

राज ठाकरेंची मागितली माफी: ऍमेझॉनवर झळकणार आता मराठी

मुंबई : मराठीच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आक्रमक भूमिका घेतल्यानंतर ऍमेझॉनने माघार घेतल्याचे दिसत आहे. ऍमेझॉनने आपल्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर मराठी भाषेचा समावेश करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती मनसे नेते अखिल चित्रे यांनी दिली आहे. यासोबतच ऍमेझॉनकडून राज ठाकरेंची दिलगिरी व्यक्त केल्याचा दावाही अखिल चित्रे यांनी केला आहे.

ज्याप्रकारे त्यांनी आपल्या वेब पेजवर किंवा मोबाइल ऍपवर भाषा निवडताना मराठी लवकरच आणत आहोत आणि आपण क्षमस्व आहोत असे त्यांनी टाकले आहे. मराठीद्वेष दाखवला तेव्हाच आम्ही मनसैनिक ऍमेझॉनला सह्याद्रीचे पाणी पाजणार असे सांगितले होते. त्याचप्रकारे शुक्रवारी काही फटाके फुटले आणि ऍमेझॉन प्रशासन खडबडून जागं झालं, असं अखिल चित्रे यांनी सांगितलं. त्याच बरोबर, राज ठाकरे, आमचे सचिव, पदाधिकारी यांना नोटीस पाठवल्यानंतर माफी मागावी अशी आमची पहिली अट होती. त्यानुसार त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. 5 तारखेला सर्व केसेस ते रद्द करणार असल्याची माहितीदेखील यावेळी चित्रे यांनी दिली.

मनसेने सुरु केलेल्या मराठी भाषेच्या मोहिमेविरोधात ऍमेझॉनने न्यायालयात धाव घेतली. यानंतर दिंडोशी न्यायालयाकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आली. न्यायालेयाने राज ठाकरे आणि काही मनसे सचिवांना 5 जानेवारीला न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला. न्यायालयाने नोटीस पाठवल्यानंतर मनसेने आपण भूमिकेवर ठाम राहणार असल्याचे सांगताना यासाठी मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा ऍमेझॉनला दिला होता. त्यावरूनच, मनसे प्रचंड आक्रमक झाली असून राज्यभरात ऍमेझॉनची कार्यालये फोडली. मनसे कार्यकर्त्यांनी पुणे, मुंबई आणि वसईमधील ऍमेझॉनच्या कार्यालयात घुसून तोडफोड केली.

मराठी नाय तर ऍमेझॉन नाय अशी घोषणाबाजी मनसैनिकांकडून करण्यात आली. मनसेच्या खळखट्याकनंतर ऍमेझॉनने माघार घेतली असून येत्या काही दिवसात आता ऍमेझॉनच्या साईटवर मराठी भाषा दिसणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.