रांजणगाव गणपती, (वार्ताहर)– ढोकसांगवी (ता. शिरुर) येथील माजी विद्यार्थी शाळेच्या आवारात एकत्र आले. इयत्ता दहावीतील माजी विद्यार्थी जुन्या आठवणी आणि हास्यविनोदामध्ये स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने रमून गेले. यावेळी माजी विदयार्थ्यांनी विद्यालयासाठी सुमारे दोन लाख रुपये खर्चून सांस्कृतिक मंच (व्यासपीठ) बांधून देण्याचे जाहिर केले.
येथील स्व. आबासाहेब पाचंगे माध्यमिक विद्यालयात सन २००४-०५ व २००५ – ०६ या वर्षातील इयत्ता दहावीतील माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्यानिमित्त एकत्र आले होते. माजी विद्यार्थी व सर्व शिक्षकांना स्नेहमेळाव्यानिमित्त निमंत्रित करण्यात आले होते. सुरुवातीला सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. सामूहिक प्रार्थना झाली. यावेळी शिक्षक व विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी फेटे बांधले होते.
काही विद्यार्थ्यांनी ओळख पटण्यासाठी शाळेतील गमतीशीर किस्से, गृहपाठ वेळेत पूर्ण न केल्यामुळे व शिस्त न पाळल्यामुळे शिक्षकांनी केलेली शिक्षा आणि सांस्कृतिक कार्यक्रमात बक्षीस मिळाल्यानंतर झालेला आनंद सांगून शिक्षकांना त्या प्रसंगाची आठवण करुन दिली.
अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी बऱ्याच वर्षानंतर एकमेकांना भेटले. त्यामुळे अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. अनेकांना शाळेतील जुने मित्र मैत्रिणी भेटल्यामुळे चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. मुख्याद्यापक बाळासाहेब सोनवणे, शिक्षक महेश धुमाळ, सुनील लांडे, दीपक गोसावी, विजय गावडे व सुनीता दळवी यांचा माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवून सन्मान करण्यात आला. यावेळी शिक्षकांनी उपस्थित माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या विद्यार्थ्यांनी विद्यालयासाठी सुमारे दोन लाख रुपये खर्चाचे भव्य सांस्कृतिक मंच बांधून देण्यात येईल असे सांगितले.