अलमट्टीचा करेक्ट कार्यक्रम करणार.. जयंत पाटील !

संभाव्य महापूर रोखण्यासाठी जयंत पाटील कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पायांच्या भेटीला.., महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांची बेंगलोरमध्ये झाली बैठक

इस्लामपूर (विनोद मोहिते) – सातारा, सांगली भागात २०१९ मध्ये आलेल्या महापुराची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून प्रयत्नशील असणारे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांची बेंगलोरमध्ये बैठक झाली.

अलमट्टीचा करेक्ट कार्यक्रम करणार का ? याकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागून राहिले होते.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा दोन्हीही राज्यातील जलसंपदा विभागाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. सकारात्मक चर्चा झाली असल्याचे बैठकी नंतर जयंत पाटील यांनी सांगितले.

गत वर्षी महाराष्ट्र राज्याच्या जलसंपदा विभागाने पाण्याचे सुव्यवस्थित नियोजन करून पूर परिस्थिती टाळली होती. पूर परिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून यापूर्वी कर्नाटक राज्यासोबत मुख्य अभियंता व सचिव स्तरावरील चर्चा केल्या होत्या. याबाबतीतच जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत जयंत पाटील हे आज शनिवारी बेंगलोरला गेले आहेत. तेथे विधानभवनात कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस.येडियुरप्पा यांनी त्यांचे स्वागत केले.

महाराष्ट्र राज्यातील सचिव विजय कुमार गौतम, ए पी कोहीरकर, सहसचिव ए. ए. कपोले,
मुख्य अभियंता हणमंत गुणाले, अधिक्षक अभियंता मिलींद नाईक तर कर्नाटक राज्याचे गृहमंत्री ना. बोम्मई,मुख्य सचिव राकेश सिंग, प्रधान सचिव मंजुनाथ प्रसाद मुख्य सल्लागार अनिल कुमार, सचिव जलसंपदा लक्ष्मणराव पेशवे,कार्यकारी संचालक मल्लिकार्जुन गुंगे यांच्यात चर्चा सुरू होती. तासाभराने ही बैठक संपली. दोन्ही राज्यात संभाव्य महापुराचा सामना करण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी सकारात्मक चर्चा झाल्याचे मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.

या विषयांवर झाली चर्चा..!

या बैठकीत महाराष्ट्र राज्याच्या भीमा व कृष्णा खोऱ्यातून सोडला जाणारा विसर्ग व त्याच्या माहितीचे आदान – प्रदान यासाठीची यंत्रणा , दोन्ही राज्याच्या धरण व्यवस्थापन व पूर नियंत्रणाबाबत संयुक्त आराखडा व कार्यप्रणाली निश्चित करणे , कर्नाटक राज्याने अलमट्टी धरणातून पाणी साठवणे व पाणी सोडण्याचे नियोजन , पूर नियंत्रण व व्यवस्थापनासाठी विविध स्तरावरील कार्यपद्धतीची चर्चा व इतर तदनुषंगिक मुद्द्यांबाबत सविस्तर चर्चा झाली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.