नवी दिल्ली – योग्यतेचे निकष पूर्ण करणाऱ्या इतर लसींनाही आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली जावी, अशी मागणी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे. तसे पत्र त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे.
देशातील करोना संकट पुन्हा तीव्र बनल्याच्या पार्श्वभूमीवर सोनियांनी नुकतीच कॉंग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. त्यानंतर मोदींना पत्र पाठवून त्यांनी काही मागण्या केल्या आहेत. करोना लसीकरण प्रक्रियेचा विस्तार केला जावा. लस घेण्यासाठी पात्र लाभार्थी ठरवताना वयाऐवजी गरज हा निकष असावा. इतर लसींनाही परवानगी मिळाल्यास लसींची उपलब्धता वाढेल. संसर्गाच्या प्रमाणानुसार राज्यांना लसींचा पुरवठा केला जावा, असे सोनियांनी पत्रात नमूद केले आहे.
करोना फैलाव रोखण्यासाठी पुन्हा कडक निर्बंध लागू केले जात आहेत. त्यामुळे गरीब आणि गरजूंना दरमहा 6 हजार रूपयांची आर्थिक मदत केली जावी. करोनाविरोधी लढ्यासाठी उपयोगी ठरणारी उपकरणे आणि औषधे वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) कक्षेतून वगळावीत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.