चिंबळी- खेड तालुक्यातील आद्योगिक क्षेत्रात असलेल्या चिंबळी, मोई, शेलू, महाळुंगे येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या वतीने पहिल्या टप्प्यातील पीक कर्जाचे वाटप करण्यात आले असल्याचे विभागीय अधिकारी विलास भास्कर तसेच विकास अधिकारी राहुल वाघमारे यांनी सांगितले. खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून या भागातील शेतकरी सभासदांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आले असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलास कातोरे इगंवले यांनी सांगितले.
चिंबळी, मोई, महाळुंगे , शेलू येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या शेतकरी सभासदांनी 31 मार्चपर्यंत भरलेल्या सर्व कर्ज सभासदांना पहिल्या टप्प्यातील पीक कर्जाचे वाटप करण्यात आले असून, चिंबळी येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या वतीने 85 शेतकरी सभासंदाना 61 लाख 72 हजार, तर मोई येथील 123 सभासदांना 81 लाख 60 हजार, शेलू येथील 115 सभासदांना 84 लाख 36 हजार रुपये, महाळुंगे इंगळे येथील 150 सभासदांना 1 कोटी 39 लाख 8 हजारांचे वाटप करण्यात आले. यावेळी चिंबळी, मोई, शेलू, महाळुंगे येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेचे सचिव नीलेश देशमुख आणि अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व संचालक, सभासद उपस्थित होते.