पिंपरी – पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पालिकेच्या विविध कार्यालयांना वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याकरीता आवश्यक यंत्रणा पालिकेच्या कार्यालयांमध्ये उभारण्यात आली आहे. सध्या पालिका भवन आणि यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे वायफाय सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे.
पालिकेच्या इतर कार्यालयांमध्ये देखील ही सेवा कार्यान्वित करण्यात येत आहे. वायफाय सुविधेचा लाभ पालिकेच्या अधिकारी, कर्मचारी व विविध कार्यालयांमध्ये येणाऱ्या नागरिकांना घेता येणार आहे. मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण यांनी सांगितले की, शहरामध्ये 215 ठिकाणी वाय- फाय लावण्यात आले आहे. यापैकी 87 ठिकाणी वाय-फाय सुरू आहे. 760 एक्सेस पॉईंटपैकी 357 पॉईंट सध्या लाइव्ह करण्यात आले आहेत.
नमुद कार्यपध्दतीचा वापर केल्यानंतर आपल्या मोबाइलद्वारे वायफाय सुविधा कार्यान्वित होईल. वायफाय सुविधेद्वारे पालिकेने निर्धारित केलेल्या पॉलिसीनुसार यू टयुब व कायद्याने प्रतिबंधित साइट उपलब्ध होणार नाहीत. तसेच, वायफाय पॉलिसीनुसार वायफाय स्पीड निर्धारित करण्यात आलेला आहे.
नागरिकांनाही लाभ होणार
वायफाय एकवेळा कनेक्ट केल्यानंतर पुढील चोवीस तासांकरीता पुन्हा लॉगिन करण्याची गरज नाही. पालिकेच्या इतर कोणत्याही कार्यालयात पुन्हा लॉगिन करावे लागणार नाही. सुविधा ऍक्सेस पॉइंटद्वारा कार्यान्वित राहील. लॅपटॉप व टॅबसाठी वायफाय उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे पालिका कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना देखील या सेवेचा लाभ घेता येणार आहे. त्यांनी मोबाइल नंबर रजिस्टर केल्यानंतर ओटीपी प्राप्त होईल. त्याद्वारे वायफाय सुविधेचा लाभ घेणे शक्य होईल. काही तांत्रिक अडचण असल्यास मे. एल ऍण्ड टी या संस्थेचे फिल्ड इंजिनिअर मोबाइल क्रमांक 9552392130, 9503186819 व 7372036051 येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोमण यांनी केले आहे.