पुणे, {प्रभात वृत्तसेवा} : मेफेड्रोन (एमडी) उत्पादन व तस्करी प्रकरणात सर्वप्रथम अटक केलेल्या पाचही आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष न्यायाधीश जे. जी. डोरले यांनी दिला. त्यामुळे या पाचही आरोपींची रवानगी येरवडा तुरुंगात झाली आहे.
याप्रकरणी वैभव ऊर्फ पिंट्या भारत माने (वय ४०, खडीचे मैदान, सोमवार पेठ), अजय अमरनाथ करोसिया (वय ३५, रा. हरकानगर, भवानी पेठ), हैदर नूर शेख (वय ४०, रा. भैरवननगर, विश्रांतवाडी), भीमाजी परशुराम साबळे (वय ४६, रा. पिंपळे सौदागर, मूळ रा. श्रीगोंदा, नगर) आणि युवराज बब्रुवान भुजबळ (वय ४१, रा. मरिबाचा वाडा, डोंबिवली) अशी या आरोपींची नावे आहेत.
माने, करोसिया व शेख यांना मेफेड्रोन विक्री करताना अटक करण्यात आली होती. या प्रकरणाच्या तपासात कुरकुंभ एमआयडीसीतील अर्थकेम लॅबोरेटरीजमध्ये ६६३ किलो मेफेड्रोन जप्त केले होते.
या कंपनीचा मालक साबळे आणि केमिकल इंजिनिअर भुजबळ याला अटक करण्यात आली होती. या आरोपींच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार स्थापन विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.