जम्मू -प्रजासत्ताक दिन जवळ येऊन ठेपल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरशी संबंधित सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांची उच्चस्तरीय बैठक झाली. त्यामध्ये संबंधित यंत्रणांसाठी ॲलर्ट जारी करण्यात आला.
देशविघातक घटकांनी कुठल्या नापाक कारवाया करण्याचा प्रयत्न केल्यास त्या उधळून लावण्यासाठी सतर्क राहण्याचा आदेश सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांना देण्यात आला.
बैठकीला लष्कर, बीएसएफ, सीआरपीएफ, पोलीस, गुप्तचर आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. सर्वच यंत्रणांना एकमेकांशी योग्य समन्वय ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. सुरक्षा आणि गस्त वाढवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
दरम्यान, जम्मूत पाकिस्तानी नागरिक असणाऱ्या तरूणाला अटक करण्यात आली. आंतरराष्ट्रीय सीमेलगत त्या तरूणाला पकडण्यात आले. सुरक्षा आणि तपास यंत्रणा त्याची कसून चौकशी करत आहेत.