नारायणगाव -किराणा मालासाठी अत्यावश्यक सेवेचा बोर्ड लावून 36 हजार 530 रुपयांचे देशी – विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या दोन व्यक्तींवर नारायणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मद्यासह सुमो जीप असा एकूण 1 लाख 36 हजार 530 मुद्देमाल जप्त केला आहे.
भरत कुंडलिक पिंगळे व परेश पांडुरंग खुडे (दोघे रा. मंचर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. नारायणगाव पोलीस मंगळवारी (दि. 5) दुपारी एकच्या सुमारास नाकाबंदी करीत असताना अत्यावश्यक सेवा किराणा माल आंबेगाव तालुका असा बोर्ड असलेली सुमो जीप (एमएच 14 जी 3771) आली. या जीपला थांबवण्याचा इशारा केला असता ती न थांबता जोरात मंचरकडे गेली.
पोलिसांनी या गाडीचा पाठलाग करून मांजरवाडी फाटा येथे थांबवली असता, गाडी चालकास पास व गाडीमध्ये काय आहे? या बाबत चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्या गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये विविध खोक्यामध्ये विविध कंपन्याचे 36 हजार 530 रुपयांचे देशी – विदेशी दारूच्या बाटल्या मिळून आल्या.
या मद्यासह 1 लाख किमतीची टाटा सुमो गाडी जप्त केली आहे. ही कारवाई पोलीस नाईक रामचंद्र शिंदे, भीमा लोंढे, दिनेश साबळे, स्वप्नील लोहार, नवीन अरगडे, पोलीस मित्र भरत मुठे आदीच्या पथकाने केली.