जेरुसलेम – जेनिन या वेस्ट बॅंक शहरात इस्रायली सेनादलांच्यावतीने करण्यात आलेल्या कारवाईच्यावेळी अल जझीरासाठी काम करणा-या एका ज्येष्ठ पत्रकाराचा मृत्यू झाला, तथापि इस्त्रायलने मात्र आपल्या कारवाईत हा मृत्यू झालेला नाहीं असे म्हटले आहे. पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, जेरुसलेममधील पत्रकार शिरीन अबू अकला यांच्या डोक्यावर या हल्ल्यात मोठी जखम झाली त्यात त्यांचा मृत्यू झाला.
दुसरा रिपोर्टर, अली समोदी याच्या पाठीवर बंदुकीची गोळी लागली असून त्याची प्रकृती स्थिर आहे, असे मंत्रालयाने सांगितले. जेनिन कॅम्पच्या परिसरात इस्त्रायली लष्कर कार्यरत होते. त्यांच्या कारवाईच्यावेळीच हा प्रकार झाल्याचे पॅलेस्टाईनचे म्हणणे आहे. इस्रायली संरक्षण दलाच्या म्हणण्यानुसार, सैनिकांनी गोळीबार करण्यापूर्वी तेथे लपलेल्या दहशतवाद्यांनी इस्त्रायली सैन्यावर गोळीबार केला आणि त्यांच्यावर स्फोटके फेकली.
त्यातून या पत्रकाराचा मृत्यू झाला आहे असे इस्त्रायली सैन्याचे म्हणणे आहे. या घटनेबद्दल अलजजीरा वृत्त वाहिनीने म्हटले आहे की, आम्ही या जघन्य गुन्ह्याचा निषेध करतो, ज्याचा उद्देश प्रसारमाध्यमांना खऱ्या बातम्या प्रसारीत करण्यापासून रोखण्याचा आहे आणि आम्ही तिच्या मृत्यूसाठी इस्रायली सरकार आणि त्यांच्या सैन्याला जबाबदार धरतो.
आमच्या सहकारी शिरीन अबू अकला हिच्या जाणीवपूर्वक केलेल्या हत्येसाठी आम्ही इस्त्रायलवर कारवाई करण्याची मागणी आंतरराष्ट्रीय समुदायाकडे करीत आहोत असेही अलजझीराने म्हटले आहे.