पुणे – निष्ठुर आई वडिलांनी बेडगी प्राणी प्रेमाखातर स्वत:च्या 11 वर्षाच्या मुलाला तब्बल दोन वर्षे 20 ते 22 भटक्या कुत्र्यांसोबत डांबून ठेवले होते. याचा मुलाच्या वर्तवणुकीवर ईतका गंभीर परिणाम झाला होता की, तो चक्क कुत्र्यांसारखा वर्तवणूक करु लागला होता. तो शाळेत गेल्यावरही कुत्र्यांसारखीच वर्तवणूक करुन मुलांचे चावे घेत होता. यामुळे त्याची शाळा बंद करुन त्याला घरीच डांबून ठेवण्यात आले होते. या पिडीत मुलाची एका स्वयंसेवी संस्थेने नुकतीच पोलिसांच्या मदतीने सुटका केली. त्याच्या आई वडिलांविरुध्द कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
यासंर्दभात कोंढवा पोलीस ठाण्यात चाईल्ड लाईन पुणे जिल्हा प्रकल्प समन्वयक अर्पणा मोडक (47) यांनी पोलीसांकडे फिर्याद दिली आहे. चाईल्ड लाईन हेल्पलाईन क्रं 1098 या मदतीसाठीची सेवा संपुर्ण देशभर असून त्यावर पुणे जिल्हा अंर्तगत एका अनोळखी व्यक्तीने फोन करुन कोंढवा मधील कृष्णाई बिल्डींग सोसायटीतील घरात एक 11 वर्षाच्या मुलास मागील दोन वर्षापासून त्याचे आई, वडीलांनी राहत्या घरात 20 ते 22 कुत्र्यां मध्ये सांभाळत असून त्याला मदतीची गरज असल्याची तक्रार केली होती.
त्याप्रमाणे चाईल्ड लाईनच्या सदस्यांनी घटनेच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता, सदर घरात एक 11 वर्षाचा मुलगा होता व तो खिडकीत कुत्र्याप्रमाणे बसलेला होता. त्याचे घरात वेगवेगळया वयोगटाची 20 ते 22 कुत्री होती . या घरातून खूप दुर्गंधी येत होती. त्यावेळेस संस्थेच्या सदस्यांनी मुलाचे आईवडीलांना घरात स्वच्छतेबाबत सांगून मुलगा शाळेत जात नसल्याने त्यास शाळेत प्रवेश घेऊन पाठविण्यास सांगितले होते..तसेच मुलाला कुत्र्यासोबत ठेऊ नका, अशी समज ही देण्यात आली होती. परंतु त्यानंतर ही मुलाचे पालक त्यास कुत्र्यांसोबत एकटे सोडून घरास बाहेरुन कुलुप लावून बाहेर गेले होते.
पुन्हा तक्रार आल्यावर खिडकीतून आत पाहिले असता कुत्र्यांच्या कळपात मुलगा दिसून आला. त्यामुळे अर्पणा मोडक यांनी मुलाचे आईवडीलांना वारंवार फोन करुन बोलवल्यानंतर ते आले. घरात जाऊन तपासणी केली असता, घरात मोठया प्रमाणात अस्वच्छता दिसून आली. मुलगा सर्व कुत्र्यात बसला होता. मुलाचे वागणे देखील कुत्र्याप्रमाणे वाटत असल्याने त्यांनी याबाबत बाल कल्याण समिती व पोलीसांकडे रितसर तक्रार दाखल केली.
सदर मुलाबाबत आजुबाजूच्या लोकांकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, संबंधित मुलगा मागील दोन वर्षापासून कुत्र्यासोबत राहत असून त्याचे आईवडील मुलास शाळेत देखील पाठवत नाही. मुलगा शाळेत गेल्यानंतर कुत्र्यासारखा वागू लागल्याने व इतर मुलांना चावत असल्याने त्याला शाळेत पाठवणे पालकांनी बंद केले होते. घटनेची माहिती मिळताच, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांचे पथक घटनास्थळी जाऊन त्यांनी परिस्थितीची पाहणी केली. याबाबत पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक चैताली गपाट करत आहे.