Akhilesh Yadav – मध्यप्रदेशातील घडामोडींवरून समाजवादी पक्षाचे (सप) अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) नाराज झाले आहेत. त्यातून त्यांनी उत्तरप्रदेशात कॉंग्रेसशी जशास तसे वागण्याचा इशारा दिला. ती बाब इंडिया (india alliance) या विरोधी पक्षांच्या आघाडीचे टेन्शन वाढवणारी आहे. मध्यप्रदेश हे राज्य विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहे. त्या राज्यात कॉंग्रेसशी हातमिळवणी करण्यास सप उत्सुक होता.
मात्र, आतापर्यंत कॉंग्रेसने सपला एकही जागा देऊ न केल्याने अखिलेश भडकले आहेत. इंडिया ही व्यवस्था केवळ राष्ट्रीय पातळीपुरती मर्यादित असल्याचे ठाऊक असते; तर मध्यप्रदेशातील बैठकीसाठी आमच्या नेत्यांनी कॉंग्रेसकडून आलेले कॉल घेतले नसते. विधानसभा पातळीवर आघाडी नसल्याची माहिती असती;
तर आम्ही मध्यप्रदेशातील जागांची यादी कॉंग्रेसकडे सोपवली नसती, असे त्यांनी म्हटले. मध्यप्रदेशात सपसाठी 6 जागा सोडण्याचा विचार कॉंग्रेस नेत्यांनी बोलून दाखवला होता. मात्र, त्या पक्षाने अद्याप एकही जागा आमच्यासाठी सोडलेली नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
मध्यप्रदेशमधील मागील विधानसभा निवडणुकीत (वर्ष 2018) सपने 1 जागा जिंकली. त्या पक्षाचे उमेदवार 5 जागांवर दुसऱ्या क्रमांकावर राहिले. मागील वेळी सपने गोंडवाना गणतंत्र पक्षाशी युती केली होती. यावेळी इंडियाच्या स्थापनेमुळे कॉंग्रेसशी हातमिळवणी करण्याची सपची इच्छा अखिलेश यांच्या भूमिकेतून अधोरेखित झाली.