मुंबई – विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त होऊन पक्ष संघटनेत कार्य करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे त्यांची नजर पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावर असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. यादरम्यान राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी प्रदेशाध्यक्षपदी ओबीसी चेहरा असावा अशी इच्छा व्यक्त केली होती आता त्यावर अजित पवार यांनी भाष्य केलं आहे.
छगन भुजबळ यांनी प्रदेशाध्यक्ष पदी मराठा समाजाऐवजी ओबीसी किंवा इतर समाजातील व्यक्ती असावा, अशी इच्छा व्यक्त केली होती. जर विरोधी पक्षनेतेपदी मराठा समाजातील व्यक्ती असेल तर प्रदेशाध्यक्ष इतर लहान समाजाकडे असावे, असेही त्यांनी सुचविले होते. यावर आता अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “छगन भुजबळांनी का बोलू नये? छगन भुजबळांचा तो अधिकार आहे” असं अजित पवार यावेळी म्हणाले.
बारामतीत अजित पवार माध्यमांशी बोलत होते. “उद्या सगळ्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन जायचं असेल तर वेगवेगळ्या घटकांना प्रतिनिधित्व का मिळू नये? त्यामुळे छगन भुजबळ यांचं बरोबरच आहे.”असं स्पष्ट मत यावेळी अजित पवार यांनी व्यक्त केलं.
काय म्हणाले होते भुजबळ नेमकं
जर विरोधी पक्षनेतेपदी मराठा समाजातील व्यक्ती असेल तर प्रदेशाध्यक्ष इतर लहान समाजाकडे असावे, अस भुजबळांनी सुचविले. मात्र, प्रदेशाध्यक्ष कोणाला करायचे याचा निर्णय स्वतः शरद पवार घेतील असं देखील भुजबळ म्हणाले होते. सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे आणि मी स्वतः ओबीसी आहे. आता प्रदेशाध्यक्ष पदाचा विचार करावा. ओबीसी नेत्याला अध्यक्ष करावे याबाबत अद्याप माझे शरद पवार यांच्याशी बोलणे झालेले नाही. मी केवळ माझे मत मांडत आहे असं यावेळी भुजबळ यांनी स्पष्ट केलं होत.