पुणे – उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांचा वाढदिवस शनिवारी (दि.22 जुलै) असून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने दि. 22 ते 31 जुलै हा सप्ताह “अजित उत्सव’ या नावाने संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जाणार आहे. ही माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
“अजित उत्सव’ आठवडाभर सुरू असलेल्या हे उपक्रम जनतेत तळागळापर्यंत वृत्तांच्या माध्यमातून पोहचविण्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील शेतकरी पेरण्या न झाल्याने संकटात आहेत याची जाणीव असल्याचे वाढदिवसाचे प्रदर्शन न करता सामाजिक उपक्रम घेऊन वाढदिवस साजरा करणार आवाहन करण्यात आले आहे. अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळ्या उपक्रमांत सगळ्या घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले.
मॅरेथॉन स्पर्धा, रक्तदान शिबिर, शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप, वॉटरफिल्टर, छत्री वाटप, शाळकरी मुलींना सायकल मोफत देण्याचा कार्यक्रम, वृक्षलागवड, ज्येष्ठ नागरिकांच्या निवासस्थानी भेटी, स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. अजितदादा जसे पहाटे उठतात, तसेच ग्रामस्वच्छता अभियानासाठी दोन तास देणे, असा उपक्रम राज्यभर राबविला जाणार आहे.