Ajit Pawar In Baramati : बारामतीतील गोविंद बागेत दरवर्षी प्रमाणे यंदा देखील दिवाळी साजरी करण्यात येत आहे. यासाठी सर्व पवार कुटुंबीय एकत्र येत असतात. मात्र यंदाच्या या कार्यक्रमासाठी पहिल्यांदाच अजित पवार यांनी हजेरी लावली नाही.
त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. मात्र असे असताना अजित पवार गटातील आमदारांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान, अजित पवार हे बारामतीतच असूनही तिकडे फिरकले नाहीत.
राज्यभरातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आज गोविंदबागेत दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेले असताना बारामतीत असूनही उपमुख्यमंत्री अजित पवार तिकडे गेले नाहीत. परंतू, थोड्याच वेळात अजित पवार काटेवाडीत दिवाळीनिमित्त सजविलेले किल्ले पाहत असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
त्यामुळे अजित पवार यांनी गोविंद बागेतील पाडवा टाळून पवार कुटुंबात दुफळी पडल्याचेच दाखवून दिले काय, अशी चर्चा रंगू लागली होती. मात्र, आता पत्नी व दोन्ही मुलांसह अजित पवार गोविंदबागेत दाखल झाले असून, शरद पवार यांच्यासोबत अजित पवार स्नेहभोजन करणार आहेत. सकाळी याच गोविंदबागेत दिवाळी पाडव्याच्या कार्यक्रमाला अजित पवार यांनी अनुपस्थिती लावलेली.