मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर सुरू असलेल्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. या प्रकरणी आज झालेल्या सुनावणीत अजित पवार गटाकडून अधिक वेळेची मागणी करण्यात आल्याने पुढील सुनावणी मंगळवार, दि. २३ जानेवारी रोजी निश्चित करण्यात आली आहे.
गतवर्षी जुलैमध्ये अजित पवार आणि पक्षाचे आठ आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. यानंतर दोन्ही गटांनी पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा केला आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आज केवळ अर्धा तास सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीनंतर राहुल नार्वेकर यांनी नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. यानुसार २३ व २४ जानेवरीला उर्वरित ४ जणांची उलट तपासणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर २५ जानेवारीला अन्य दोघांची साक्षीदारांची उलट साक्ष नोंदवली जाणार असून २९ जानेवारीला दोन्ही गटांचे लेखी सबमिशन दिले जाणार आहे. तसेच ३० तारखेला अंतिम युक्ितवाद होणार असून ३१ जानेवारीला सुनावणी पूर्ण करण्यात येईल. त्यापुढे काही दिवसांमध्ये अंतिम निकाल जाहीर करण्यात येईल, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली.
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, आमचे म्हणणे नोंदवले जाईल या अपेक्षेने आम्ही शनिवारी राज्य विधिमंडळ संकुलात आलो होतो. परंतु अजित पवार गटाने आमच्याकडून दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांचा अभ्यास करण्यासाठी आणखी वेळ मागितला. यानंतर सभापतींनी त्यांना वेळ वाढवून देत 23 जानेवारीपासून सुनावणी निश्िचत केली, अशी माहिती त्यांनी दिली.
आमच्या काही सहकार्यांना सरकारमध्ये सामील होऊन आता सहा महिने झाले आहेत. आम्ही त्यांच्याविरुद्ध अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. पण लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक लक्षात घेऊन या प्रकरणाचे वेळापत्रक तयार केले आहे, असा आरोप त्यांनी केला.