Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना सुरुवातीला घशाचा त्रास झाला होता, त्यामुळे अनेक ठिकाणी त्यांची अनुपस्थिती होती. काही दिवसांपूर्वी त्यांना डेंग्यूची लागण झाल्याचं समोर आलं. आता त्यांच्या प्रकृतीविषयी त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. संजय कपोटे यांनी माहिती दिली आहे.
अजित पवारांना पाच दिवसांपासून डेंग्युची लागण झाली आहे. त्यांना १०१ अंश सेल्सिअस इतका ताप असल्याची माहिती डॉ. संजय कपोटे यांनी माध्यमांना दिली. त्यासोबतच त्यांना अंत्यत अशक्तपणा आला असून एक पायरी चढली तरी त्यांना थकवा येत असल्याचे डॉक्टरांनी म्हटले.
तसंच, पेशींची कमजोरी आणि इतर अवयव कसे आहेत हे पाहण्यासाठी काही चाचण्या केल्या जाणार आहेत. या चाचण्यांचे अहवाल आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करायचे की नाही ठरवले जाणार असल्याची माहिती डॉक्टरानी दिली.
अजित पवारांवर सध्या घरातच उपचार सुरू आहेत. घरात आयसीयूसारखी खोली तयार करण्यात आली असून तिथेत त्यांना सलाईन लावली जात आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. डेंग्यु संसर्गजन्य असल्याने या आजारातून येणारा अशक्तपणा जाण्यास एक महिना तरी लागतो, असेही डॉक्टर म्हणाले आहे.
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चिघळत चालला आहे. या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तोडगा काढण्यासाठी आणि माध्यमांना सामोरे जात आहेत. परंतु, अजित पवार कुठेच दिसत नसल्याने शंका उपस्थित केली जात होती. परंतु, त्यांना डेंग्युची लागण झाल्याची माहिती समोर आली. दरम्यान, त्यांच्यावर अनेक दिवसांपासून उपचार सुरू आहेत. त्यामुळे ते सध्या आराम करत असून डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती लवकरच सुधारणार असून पुन्हा एकदा सक्रिय राजकारणात ते येतील, अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली.