मुंबई :- राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील आपल्या समर्थकांसह शिंदे – फडणवीस सरकारमध्ये सहभागी झालेल्या अजित पवारांनी मुंबईतील मंत्रालयाच्या इमारतीच्या 6 व्या मजल्यावरील मुख्यमंत्री कार्यालयापुढे असणाऱे 602 क्रमांकाचे कार्यालय घेण्यास नकार दिल्याचे वृत्त आहे. या ऐवजी त्यांनी याच मजल्यावरील अन्य एका ठिकाणी आपले कार्यालय थाटण्याचा निर्णय घेतला आहे. या गोष्टीची राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयापुढेच 602 क्रमांकाचे कार्यालय आहे. ते 3 हजार चौरस फुटांवर पसरलेले असून, त्याची केबिनही खूप मोठी आहे. विशेषतः या कार्यालयाच्या अगदी समोर मुख्यमंत्र्यांचे कार्यालय आहे. त्यामुळे हा मजला महाराष्ट्राच्या सत्ताकारणाचा केंद्रबिंदू मानला जातो. पण त्यानंतरही अजित पवारांनी कथित अंधश्रद्धेमुळे 602 क्रमांकाची खोली कार्यालय म्हणून घेण्यास नकार दिल्याची खात्रीलायक माहिती आहे.
2014 मध्ये भाजप नेते एकनाथ खडसे यांनी कृषी, महसूल व अल्पसंख्याक व्यवहार खात्याचा पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी 602 क्रमांकाच्या कक्षात आपले कार्यालय थाटले. पक्ष व मंत्रिमंडळातील ज्येष्ठताक्रमानुसार त्यांना ही खास केबिन देण्यात आली. पण त्यानंतर अवघ्या दोनच वर्षांत भाजपच्या या मातब्बर नेत्याला भूखंड घोटाळ्याप्रकरणी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.
त्यानंतर, भाजप नेते पांडूरंग फुंडकर यांनाही कृषीमंत्री असताना हा कक्ष देण्यात आला होता. पण मे 2018 मध्ये हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचे निधन झाले. त्याचवर्षी अनिल बोंडे यांच्याकडे कृषी मंत्रालयाचा पदभार देण्यात आला. त्यांनाही याच कक्षाचे वाटप करण्यात आले. मात्र, त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. या घटनांमुळे अजित पवारांनी मंत्रालयाच्या 6 व्या मजल्यावरील 602 खोलीत कार्यालय थाटण्यास नकार दिल्याची माहिती आहे.
502 क्रमांच्या कक्षाला पसंती…
अजित पवारांना आता मुख्य सचिवांसाठी असलेल्या 502 क्रमांकाचा कक्ष कार्यालयासाठी देण्यात आला आहे. या मजल्यावर मुख्य सचिव आणि अतिरिक्त मुख्य सचिवांचीही केबिन आहे. दरम्यान, 602 क्रमांकाच्या कक्षाऐवजी दुसरा कक्ष घेण्याविषयी अजित पवारांना प्रश्न केला असता ते म्हणाले की, नवीन खोली मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाजवळ आहे. मुख्यमंत्र्यांशी सुसंवाद राखण्यासाठी ही जागा खूप चांगली आहे.