मुंबई : अजित पवार (Ajit Pawar) यांच्या दिल्ली दौऱ्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. अजित पवारांच्या या दिल्ली दौऱ्यानंतर त्यांची दिवाळीनिमित्त शरद पवार यांच्यासोबत भेट झाली. त्यामुळे या भेटीगाठींवर चर्चांना उधाण आलं आहे. या सर्व घडामोडींदरम्यान भाजप नेते आणि राज्याचे ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी अजित पवार यांना धूर्त राजकारणी म्हटले आहे. सध्या गिरीश महाजन यांनी केलेल्या विधानाची चांगलीच चर्चा रंगली आहे.
काय म्हणाले गिरीश महाजन ?
“अजित दादा हे धूर्त राजकारणी आहेत, पोटात एक आणि ओठावर एक हे मला माहित नाही. परंतु दादा हे धूर्त राजकारणी आहेत, त्यामुळेच तर ते इतके वर्ष राजकारणामध्ये टिकून आहेत. आतासुद्धा मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ते बाहेर पडले. त्यांच्या सोबत 54 आमदारांपैकी 42 आमदार त्यांच्यासोबत आहेत. त्यामुळे याबाबत दुमत असल्याचं कारणच नाही. ते धूर्त राजकारणी आहेतच”, असे गिरीश महाजन म्हणाले.
दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी अजित पवार यांच्याबाबत वेगळा दावा केला. अजित पवार यांची गळचेपी होत असल्याने ते दिल्लीला गेले. तिथे जावून त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली असल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर निधीवाटपावरून अजित पवार गट नाराज असून अमित शहा यांच्यासोबतच्या झालेल्या भेटीत याबाबत चर्चा झाल्याबाबत शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. मात्र यावर त्यांनी बोलण्यास नकार दिला.