सातारा – अजिंक्यतारा हॉस्पिटलने अल्पावधीत सातारच्या वैद्यकीय क्षेत्रात एक आश्वासक पाऊल टाकले आहे. या हॉस्पिटलचा अद्ययावत अतिदक्षता व शस्त्रक्रिया विभाग रुग्णांसाठी देवदूत ठरावा, अशी अपेक्षा खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली.
साताऱ्यातील अजिंक्यतारा हॉस्पिटलने आपल्या चार वर्षाच्या वाटचालीत एक महत्त्वपूर्ण टप्पा ओलांडला असून दसऱ्याच्या मुहूर्तावर या हॉस्पिटलमधील अत्याधुनिक आयसीयू व शस्त्रक्रिया विभागाचे उदघाटन विविध मान्यवरांच्या हस्ते पार पडले. यावेळी खासदार उदयनराजे बोलत होते. कार्यक्रमास आ. शिवेंद्रराजे भोसले, माणदेशी फाउंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील, डॉ. संजय कोरडे, डॉ. विजयकुमार सुखटणकर, डॉ. मोहन सुखटणकर, डॉ. संजय पाटील, डॉ. सोमनाथ साबळे, डॉ. कौशिक पाटील, डॉ. संग्राम देशमुख, डॉ. मनीष तपासे, डॉ. चैतन्य बोकील, डॉ. स्वप्नील कदम, सीए शैलेंद्र पवार, करण सिन्हा आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, “”दिवसेंदिवस माणसाचे आयुष्यमान घटत चालले आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे जेवढे गरजेचे आहे तेवढेच रुग्णांना नवसंजीवनी देणाऱ्या हॉस्पिटल्सचीही गरज आहे. साताऱ्यातील अशा हॉस्पिटलची ही गरज अजिंक्यतारा हॉस्पिटलने नक्कीच पूर्ण केली आहे. हे हॉस्पिटल सातारकरांची आयुष्यरेषा बळकट करणारे ठरेल.”
अजिंक्यतारा हॉस्पिटल सातारा जिल्ह्यासाठी एक आरोग्यदायी पर्व ठरत असून भविष्यात माणदेशी फाउंडेशन आणि अजिंक्यतारा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रात समाजासाठी सेवाभावी दृष्टीकोनातून एकत्र काम करण्याचा मानस चेतना सिन्हा यांनी यावेळी व्यक्त केला. अजिंक्यतारा हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रसन्न बाबर, डॉ. शंतनु पवार, डॉ. सचिन गुरव, डॉ. अनिकेत अष्टेकर, डॉ. अनिकेत ढापरे यांच्यासह टीम अजिंक्यतारा यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमास साताऱ्यातील डॉक्टर्स, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.