सातारा (प्रतिनिधी) – नवी दिल्ली येथील राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्यावतीने 2019-20 या वर्षाचा उत्कृष्ट ऊस उत्पादकतेचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार अजिक्यतारा सहकारी साखर कारखान्याला जाहीर झाला आहे.
या पुरस्कारामुळे कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे, अशी प्रतिक्रिया मार्गदर्शक संचालक, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
अजिंक्यतारा कारखान्याने सभासद शेतकऱ्यांचे हित जोपासताना, सहकार क्षेत्रातील आदर्श वाटचाल जोमाने सुरू ठेवली आहे. कारखान्याच्या यशस्वी वाटचालीत मोलाचे योगदान देणाऱ्या शेतकरी सभासद व कामगारांचे आ. शिवेंद्रराजे यांनी आभार मानले आहेत.
ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना एफआरपीनुसार वेळच्या वेळी संपूर्ण पेमेंट अदा करणारा कारखाना, असा नावलौकिक अजिंक्यतारा कारखान्याने राज्यात मिळवला आहे. कारखान्याला राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघचा उत्कृष्ट ऊस उत्पादकतेचा पुरस्कार जाहीर होणे, ही अभिमानाची बाब आहे.
या पुरस्कारामुळे संस्था अधिक सक्षमपणे चालवण्याची प्रेरणा संचालक मंडळाला मिळणार आहे. आगामी काळात कारखाना देशात आदर्श ठरेल, असा विश्वास आ. शिवेंद्रराजे यांनी व्यक्त केला आहे.