मुंबई -कसोटी फलंदाज असा शिक्का एकेकाळी बसलेल्या अजिंक्य रहाणेने आपल्या तोडफोड फलंदाजीने यंदाची आयपीएल स्पर्धा गाजवली आहे. तब्बल 200 च्या स्ट्राईक रेटने तो दावा करत आहे. त्यामुळे येत्या काळात हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील भारताच्या टी-20 संघात रहाणेला स्थान मिळेल असे संकेत खुद्द बीसीसीआयकडूनच मिळत आहेत.
यंदाच्या मोसमात 4 वेळा ही स्पर्धा विजेता चेन्नई सुपर किंग्जचा संघ जास्त भक्कम वाटत आहे. त्यातही या संघात यंदाच्याच वर्षी दाखल झालेला रहाणे प्रचंड भरात आहे. चेन्नईच्या या यशात ज्या खेळाडूंच्या कामगिरीचा मोठा वाटा आहे त्यात रहाणेचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.
आयपीएल लिलावात चेन्नईने रहाणेवर विश्वास ठेवत 50 लाखांच्या मूळ किमतीत आपल्या ताफ्यात सामील केले. रहाणे या आयपीएलमध्ये जसा खेळतोय तशी अपेक्षा कोणीही केली नसेल. रहाणेने सीएसकेकडून या मोसमात 52 पेक्षा जास्त सरासरीने व 199 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. संपूर्ण आयपीएल 2023 मध्ये स्ट्राइक रेटच्या बाबतीत दुसरा कोणताही फलंदाज रहाणेशी बरोबरी करू शकलेला नाही.
आता भारताच्या टी-20 संघात त्याचे पुनरागमन होण्याचे संकेत मिळत असून या प्रकारात भारतीय संघ बदलाच्या टप्प्यातून जात आहे. 2022 सालच्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेतील पराभवानंतर हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली अनेक नवीन खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे. रहाणेने अशीच कामगिरी करत राहिल्यास तोही पुनरागमन करू शकतो.