दहशतवाद्यांनी भारतात हल्ले करू नये म्हणूनच “एअर स्ट्राईक’ – लष्कर प्रमुख बिपीन रावत

एझिमाला – दहशतवादी कारवायांचे सीमेपलिकडे प्रशिक्षण घेणारे दहशतवादी भारतात हल्ले करण्यासाठी जिवंतच राहू नयेत, म्हणूनच भारतीय हवाई दलाने फेब्रुवारी महिन्यात बालाकोट येथे “एअर स्ट्राईक’केला होता, अशी माहिती लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी दिली. सीमेपलिकडील दहशतवादाला रोखण्यासाठी सरकारच्या विविध संस्थांमधील समन्वयाद्वारे सामूहिक प्रयत्न केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. नौदल आणि तटरक्षक दलाच्या जवानांच्या “पासिंग आऊट परेड’नंतर पत्रकारांबरोबरच्या वार्तालापात ते बोलत होते.

“रडार’बाबत संरक्षण तज्ञांचे समर्थन आणि स्पष्टिकरण

अलिकडेच टिव्हीवरील एका मुलाखतीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही संरक्षण तज्ञांचा हवाला देऊन खराब हवामानामुळे “एअर स्ट्राईक’ पुढे ढकलण्याचा सल्ला मिळाला होता, असे सांगितले. त्यावरून रडारबाबत संरक्षण तज्ञांना पुरेसे ज्ञान नसल्याची टीका झाली होती. पण काही रडार ढगांच्या आरपार बघू शकतात. काही रडारमध्ये तशी क्षमता नसते, असे स्पष्टिकरण लष्कर प्रमुखांनी दिले. “एअर स्ट्राईक’च्या दिवशी हवामान खराब होते. त्यामुळे काही संरक्षण तज्ञांच्या मनात “एअर स्ट्राईक’ पुढे ढकलण्याचा विचार आला होता.

सर्व सरकारी संस्थांद्वारे होणाऱ्या सामूहिक प्रयत्नांमध्ये आता “एनआयए’ आणि “ईडी’ ने ही भाग घेतला आहे. दहशतवाद्यांना होणारे अर्थसहाय्य तोडण्यासाठी या सर्वांचे एकत्रित प्रयत्न केले जात असून आता परिस्थिती नियंत्रणात आणली गेली आहे, असे जनरल रावत यांनी सांगितले.

देशसमोर स्वातंत्र्यापासूनच दहशतवादाची समस्या आहे. सुरक्षा दलांनी अन्य संस्थांच्या सहकार्याने या समस्येचा सामना केला आहे. घुसखोरी नियंत्रणात आणायल यश आले आहे. दहशतवाद्यांना आपल्या शेजारून सहाय्य मिळत असते. दहशतवाद्यांकडून चुकीच्या माहितीच्या आधारे अनेकांची दिशाभूल केली जाते. त्यामुळेच काश्‍मीर खोऱ्यातील परिस्थिती थोडी कमी जास्त होत असते, ही गोष्ट खरी आहे, असेही जनरल रावत म्हणाले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)